हिंगोली- परभणी येथील कोविड वॉर्डमधून पळ काढून आपल्या पारडा या गावी येण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईत गुन्हेगारास बासंबा पोलिसांच्या पथकाने अटक केली. पोलिसांनी २४ तासात गुन्हेगारास बेड्या ठोकून परभणी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. मुलीची भेट घेऊन लांब पलायन करण्याचा आरोपीचा प्रयत्न होता. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याचा प्रयत्न फसला.
विकास गोविंदपुरे असे आरोपीच नाव आहे. तो व बाळू तोरकड, विकास तोरकड या तिघांनी मिळून पारडा शिवारात ७ महिन्यापूर्वी जादूटोणा करण्याच्या कारणावरून शंकर घेणे या व्यक्तीचा खून केला होता. याप्रकरणी या तिघांवर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून हे तिघेजण परभणीच्या कारागृहात शिक्षा भोगत होते. दरम्यान, विकास गोविंदपुरे याला कोरोनाची लागण झाली, त्यामुळे त्याला परभणी येथील कोरोना वॉर्डमध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले होते. मात्र, आरोपी व इतर तिघे जण वॉर्डमधील बाथरूम मधल्या खिडकीतून बेडशीटच्या साहायाने पळून गेले. त्यापैकी विकास गोविंदपुरे हा पारडा येथे आला होता.