हिंगोली - जलालदाबा सर्कलच्या अंतर्गत येणाऱ्या १० गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पण, शासन प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले. हा भाग डोंगरी भाग म्हणून जाहीर करा, अशी मागणी असूनही ती पूर्ण केली जात नाही. त्यामुळे या गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन देऊन त्यांनी हा निर्णय घेतला.
पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे या गावात संघ नाईक तांडा, काळापाणी तांडा, लक्ष्मण नाईक तांडा, सावरखेडा, लोहरा बुद्रुक, दरेवाडी, रेवनसिद्ध तांडा, पवार तांडा, तामटी तांडा या दहा गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये आज घडीला पिण्याच्या पाण्याची मोठी भीषण टंचाई जाणवत आहे. गावालगतच्या सर्वच विहिरी कोरड्या पडल्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. एवढेच नव्हे तर कोसो दूर अंतरावर असलेल्या विहिरीत उतरून, जीव मुठीत ठेऊन पाणी भरण्याची वेळ येत आहे.
एवढी गंभीर परिस्थिती असतानाही, या भागात कोणत्याच राजकीय पक्षाच्या नेत्याने किंवा कार्यकर्त्याने साधे डोकावूनही पाहिले नाही. त्यामुळे दहा गावातील नागरिकांनी येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकलेला आहे. विशेष म्हणजे अनेकदा प्रशासन दरबारी खेटे घालुनही पाणी प्रश्न अद्याप सुटला नाही. सोबतच विकासाच्या नावानेही वानवा असल्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
आजही शाळकरी मुलांना शाळा सोडून पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. एवढेच नव्हे तर लहान मुलांच्या कंबरेला दोर बांधून त्याला तळाशी पाणी गेलेल्या विहिरीत उतरविले जाते. नंतर तो मुलगा आपली भांडे भरून नातेवाईकांना दोरीच्या साह्याने वर देतो. मात्र विहिरीत कमी असलेले पाणी भरण्यासाठी जणू स्पर्धाच लागते. त्यामुळे या गडबडीत येथे जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. आता तरी प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी नागरिक करीत आहेत. मात्र जोपर्यंत लिखित पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्यासह इतर विकास करण्याचे लिखित आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मतदान न करण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतलं आहे.