पणजी- अमलीपदार्थ तस्करीप्रकरणी पेडणे पोलिसांनी ४ रशियन नागरिकांना दांडोसवाडा-मांद्रे (ता. पेडणे) येथून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ७ लाख किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्यांनी एटीएम मशीन फोडून ९ लाखाची चोरी केल्याचे कबूल कले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती उत्तर गोवा पोलीस अधीक्षक चंदन चौधरी यांनी दिली.
पेडणे पोलिसांना मिळाळेल्या माहितीनुसार शुक्रवारी दांडोसवाडा-मांद्रे येथे एका घरावर पोलिसांनी छापा टाकला. तेथे एकजण भाडोत्री घरात गांजाची रोपे वाढवत होता. त्याने दिलेल्या माहितीनुसार, अन्य एका घरात छापा टाकला असता तेथे तिघेजण अन्य प्रकारच्या अंमलीपदार्थासह सापडले. जप्त करण्यात आलेल्या अंमलीपदार्थांची किंमत बाजारपेठेत सुमारे ७ लाख रूपये आहे. यावेळी रेडिक वेफिन (३५), एवजेनी जखरीन (३८), इगोर मार्कोव्हा (३२) आणि एलिया अलेक्झांडरोवीच (३०) अशी अटक केलेल्या रशियन नागरिकांची नावे आहेत.
या संशयितांनी वापरलेली स्विफ्ट कार (जीए-०३-डब्लू-५६६६) शोधून ताब्यात घेतल्यानंतर त्यामध्ये दरोड्यासाठीचे साहित्य आढळून आले. यामध्ये लॅपटॅाप, एलपीजी गॅस सिलिंडर, गॅस कटर, हँडग्लोज, सेफ्टी फ्युज, ब्लॅक स्प्रे, वायर, बँटरी, प्लास्टिक पाइप्स, होकायंत्र, मास्क, गाडीच्या दोन नंबर प्लेट्स आदी अनेक वस्तू आढळून आल्या आहेत. हे सर्व जप्त साहित्य जप्त करण्यात आले असल्याचे चौधरी यांनी सांगितले.