गोंदिया- पुरुषप्रधान संस्कृतीला फाटा देत मागील काही वर्षात प्रत्येक क्षेत्रात महिलांचा पुढाकार वाढला आहे. एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के प्रतिनिधित्व मिळाले आहे. त्यातच शासनाच्या विविध उपक्रमांसह नोकरीमध्येही महिलांना संधी मिळत आहे. त्यातून महिला सक्षम होत असल्याची अनेक उदाहरणेही पाहावयास मिळत आहेत. जिल्ह्यातही याचे प्रतिबिंब दिसत आहे. जिल्ह्याची सुरक्षा व विकास आता महिलांच्या हाती देण्यात आल्याचे जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अनुभवास येत आहे.
गोंदियाच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक पदी १ मार्चला पदभार घेतलेल्या विनिता साहु, तर गोंदिया जिल्हा आगार प्रमुख म्हणून संजना पटले यांनी आपल्या कार्याची छाप सोडली आहे. गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयात मुख्य न्यायाधीश पदावरही माधुरी आनंद यांनी दिलेले निर्णयांची गेल्या एका वर्षापासून प्रशंसा होत आहे. तसेच गोंदिया जिल्हा परिषदेत अध्यक्षपदी सीमा मडावी यांच्या खांद्यावर जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील विकासाची धुरा आहे.
गोंदिया आगार प्रमुख रंजना पटले यांनी आगाराची माहिती देताना सांगितले, की गोंदिया जिल्हा हा नक्षलग्रस्त भाग असला तरी आमच्या जिल्ह्याचे कामकाज महिलांच्या हाती आहे. या महिला आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत आहेत. जिल्ह्याच्या आगारात २६ महिला कर्मचारी वाहक म्हणून कार्यरत आहेत आणि ६ महिला मॅकेनिकल म्हणून काम करतात. तसेच २८ बसेस मानव विकास बसेस आहेत. त्या बसेसमध्येही महिला वाहक आहेत. त्या गोंदिया जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत जातात. तसेच सकाळची शाळा असली, तरी वाहक महिला आपल्या जबाबदारी पूर्ण पाडत आहेत. बसमधील इंजिनचे काम असो, बसचे चाक बदलणे असो किंवा कोणतेही काम असो या मॅकेनिक महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आपले कर्तव्य बजावत आहेत.
जिल्हा परिषदेला काम करताना अनेक अडचणींना सामोर जावे लागते, मात्र त्या अडचणींना तोंड देत काम करताना आनंदही येतो. आज जिल्हा परिषदेला ८० पेक्षा अधिक कर्मचारी काम करत आहेत. तसेच जिल्हा परिषद तर्फे महिलांसाठी व मुलींसाठी सायकल व शिलाई मशीनही वाटप केले आहे. पशुसंवर्धन मार्फत महिला बचत गटांना त्याचा लाभ दिला जातो. जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागामार्फत महिला दिनानिमित्त महिलांना जनजागृती कार्यक्रमांतर्गत सॅनेटरी नॅपकीनचा फायदा आणि कापड वापरण्याचे तोटे याची माहिती दिली जाते, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी यांनी दिली.
गोंदियाच्या पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनीही पोलीस दलात राबवण्यात येणाऱ्या अनेक योजनांची माहिती दिली. त्या म्हणाल्या, की गामीण भागात राहणाऱ्या महिलांना पोलिसांची भीती वाटते. अशा महिलांसाठी एक नवा उपक्रम चालू करण्यात येणार आहे. पोलीस आपल्या दारी मोहिम राबवली जाणार आहे. दामिनी पथकामध्ये वाढ केली जाणार असून ते शाळा, महाविद्यालय आणि बाजारात हालचालींवर नजर ठेवतील. तसेच फिरते पोलीस स्टेशनचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. याचा फायदा होऊन जे लोक पोलीस स्टेशनमध्ये येण्यासाठी घाबरतात त्या लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच लोकांमधील पोलिसांबद्दलचे गैरसमज दूर होतील.