गोंदिया- जिल्ह्यातील इर्री टोला या गावातील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिकेची तिच्या पतीनेच कुऱ्हाडीने हत्या केल्याची घटना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. हत्येचे कारण अद्याप समजले नाही. मात्र, या हत्येमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून परिसरामध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
गोंदियात शाळा सुरू असताना शिक्षिका पत्नीची हत्या; पती फरार - husbund
पती दिलीप डोंगरे शाळेत आला. प्रतिभाला शाळेच्या कार्यालयात बोलावले. त्या दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर त्याने प्रतिभाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली आणि त्यांच्या डोक्यावर आणि मानेवर कुऱ्हाडीने वार केले.
प्रतिभा डोंगरे (वय ४०) असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. त्या इर्रीटोला जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शिकवत होत्या. नेहमीप्रमाणे त्या आज सकाळी ११ वाजता वर्ग घेत होत्या. त्यावेळी त्यांचा पती दिलीप डोंगरे शाळेत आला. प्रतिभाला शाळेच्या कार्यालयात बोलावले. त्या दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर त्याने प्रतिभाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली आणि त्यांच्या डोक्यावर आणि मानेवर कुऱ्हाडीने वार केले. प्रतिभाने आरडोओरड करताच इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांना बघून आरोपी दिलीप घटनास्थळावरून फरार झाला. मात्र, काही वेळातच प्रतिभाचा मृत्यू झाला.
कर्मचाऱ्यांनी घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी गोंदिया रुग्णालयात पाठवला. तसेच फरार आरोपीचा शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.