गोंदिया- राज्यातील मंदिरे तत्काळ उघडण्याच्या मागणीसाठी आज विश्व हिंदू परिषदेच्या वतीने गोंदिया शहरातील सिव्हिलाईन परिसरातील हनुमान मंदिरासमोर ढोल बजाओ आंदोलन करून महाआरती करण्यात आली.
गोंदियात मंदिरे सुरू करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे ढोल बजाओ आंदोलन कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील सर्व मंदिरांसह सगळे काही बंद करून लॉकडाऊन करण्यात आले. मात्र हळुहळु 'अनलॉक' होत सगळी दुकाने बाजारपेठा सुरू झाल्या. मात्र, आजही गेल्या सात महिन्यांपासून मंदिरे बंद आहेत. एकीकडे दारूची दुकाने सुरू करण्यात आली, मॉल सुरू करण्यात आले आहेत. आठवडी बाजारही सुरू झाली असताना मंदिरेच बंद ठेवली जात असल्याने भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत.
अन्यथा मंदिराचे कुलूप तोडून प्रवेश
मुख्य म्हणजे सणासुदीच्या दिवसात मंदिर कुलूपबंद असल्यामुळे हिंदू बांधवांना देवीदेवतांचे दर्शन घेता येत नाही. तेव्हा कुलूपबंद असलेली मंदिरे त्वरीत सुरू करण्यात यावीत. या मागणीला घेऊन आज विश्व हिंदू परिषदेच्या वतीने गोंदिया शहरातील सिव्हिललाईन परिसरातील हनुमान मंदिरासमोर ढोल बजाओ आंदोलन करून महाआरती करण्यात आली. यावेळी महाविकास आघाडी सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता. लवकरात-लवकर मंदिरे खुली करा अन्यथा आम्ही पुढे स्वतः मंदिराचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश करून पूजा-अर्चा करत आरती करण्यास सुरुवात करणार असल्याचे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सांगण्यात आले.
हेही वाचा -देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण; झाले क्वारंटाईन