गोंदिया- आमगाव तालुक्यातील गोसाईटोला ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत ग्रामसेवक 2 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात बुधवारी सापडला आहे. लाचखोर ग्रामसेवकांविरोधात आमगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. प्रल्हाद रूपचंद चौधरी, असे लाचखोर ग्रामसेवकाचे नाव आहे.
गोंदियामध्ये 2 हजाराची लाच घेताना ग्रामसेवक अटकेत - गोंदिया news
आमगाव तालुक्यातील गोसाईटोला ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत ग्रामसेवक 2 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.
गोसाईटोला येथील तक्रारदार हा व्यवसायाने कंत्राटदार आहे. सन 2018-19 साली गोसाईटोला ते नंगपूरा या रोडवर नाला बांधकामाचे कंत्राट त्याने ग्रामपंचायतीकडून मिळवले होते. ते काम त्याने मुदतीत पूर्ण करून 1 लाख 59 हजार 400 रुपयांचे देयक ग्रामपंचायतीकडे सादर केले होते. या कामाचे देयक काढण्यासाठी ग्रामसेवक प्रल्हाद रूपचंद चौधरी याने फिर्यादीकडे 2 हजार लाचेची मागणी केली. याबाबत त्याने गोंदियाच्या लाचलुचपत विभागाकडे याची तक्रार केली.
या तक्रारीची लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी शहानिशा करून आरोपी विरुद्ध सापळ्याचे नियोजन केले. बुधवारी तक्रारदाराकडून आरोपीने 2 हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने आरोपीस रंगेहाथ पकडले. या प्रकरणी ग्रामसेवक चौधरी विरुद्ध आमगाव पोलीस ठाण्यात कलम ७ लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, चौधरीच्या गोंदिया येथील राहत्या घराची पोलिसांनी झडती घेतली.