गोंदिया- ३९ दिवस ग्रीन झोनमध्ये असणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात १९ मे पासून कोरोना संसर्गाचा शिरकाव सुरू झाला. सतत वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे जिल्हा यंत्रणेसमोर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, आज २५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतल्याने जिल्ह्यातील यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. ३ नवीन कोरोनाबाधित रुग्ण वाढल्याने एकूण संख्या ६२ वर पोहोचलीय. जिल्ह्यात सध्या ३४ अॅक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यापूर्वी 3 जण कोरोनामुक्त झालेत.
आतापर्यंत जिल्ह्यातील ९५० व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ६२ नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह तर ८३१ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. ५४ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्ह्यात एकूण १९ क्रियाशील कंटेनमेंट झोन आहेत. जिल्ह्यातील ग्रामस्तरावर असलेल्या विविध शाळा व इतर संस्थांमध्ये ३९६४ आणि ८८४५ व्यक्ती गृह विलगीकरणात आहेत.