गोंदिया -जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग आता लहान बालकांना सुद्धा होऊ लागला आहे. मंगळवारी 6 महिन्यांच्या बालिकेला आणि अन्य दोघा जणांना कोरोना संसर्गाची बाधा झाल्याचा अहवाल गोंदिया येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेतून प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 127 वर पोहोचली आहे. मात्र नोंद 125 रुग्णांची करण्यात आली आहे.
दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण वाढत आहेत. विशेषतः लहान बालिका संसर्ग झाल्याचे आढळल्याने चिंतेत भर पडली आहे. मंगळवारी आढळलेले तीनही रुग्ण हे गोंदिया तालुक्यातील आहे. उर्वरित दोन रुग्ण 20 ते 40 वर्षे वयोगटातील आहेत. गोंदिया येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेकडे 321 अहवाल प्रलंबित आहे.
आतापर्यंत 102 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. जिल्ह्यात आता 24 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. गोंदियाच्या प्रयोगशाळेत कोरोना संशयित 2993 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. प्रयोगशाळेत सध्या 321 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.
जिल्ह्यातील विविध शाळा व संस्थांमध्ये 338 आणि घरी 1367 अशा एकूण 1705 व्यक्ती विलगीकरणात आहे. जिल्ह्यात अॅक्टिव्ह कंटेंनमेंट झोन अकरा असून यामध्ये गोंदिया तालुका – मुंडीपार, फतेहपूर, डोंगरगाव, शेजगाव,पारडीबांध कुंभारेनगर (गोंदिया) सालेकसा तालूका – पाऊलदौना व पाथरी,तिरोडा तालुका -तिरोडा (सुभाष वार्ड) आणि सडक/अर्जुनी तालुका -राका आणि सौंदड याचा समावेश आहे. ही माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे यांनी दिली.