गोंदिया- जिल्ह्यातील आमगाव नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या मोहनटोला वॉर्ड क्रमांक पाच या वॉर्डात मुख्य डांबरीकरण रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. त्यामुळे पाऊस पडला की, रस्त्यावरुन वाहन चालवताना आणि पायी चालताना अनेक अडचणी येत आहे. विद्यार्थ्यांनाही शाळेला जाताना अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांनी प्रशासन व स्थानिक प्रतिनिधींविरोधात निषेध रॅली काढली होती.
चिमुकल्या विद्यार्थ्यांनी प्रशासन व स्थानिक जनप्रतिनिधींविरोधात काढली निषेध रॅली
मोहनटोला येथील मुख्य डांबरीकरण रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रशासन व स्थानिक जन प्रतिनिधींविरोधात निषेध रॅली काढली होती.
रस्ता चिखलमय झाला असल्याने याच रस्त्यावर असलेल्या चिखलालातून चिमुकल्या विद्यार्थ्यांना चिखलातून शाळेत जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे झोपलेल्या प्रशासन आणि स्थानिक जन प्रतिनिधींना ही बाब लक्षात आणून देण्यासाठी विद्यार्थ्यांनी निषेध रॅली काढली.
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव नगर परिषदेच्या स्थापनेनंतर जनतेचा गतिशील विकास व्हावा यासाठी शासनाने आठ ग्रामपंचायतींना समायोजित करून नगर परिषदेचा दर्जा बहाल केला. मात्र जनप्रतिनिधी तसेच राजकारणातील पुढाऱ्यांनी स्वतःच्या राजकारणासाठी नगर परिषदेचा विषय न्यायालयात दाखल केल्याने विकासाच्या गतीचे चक्र फिरता फिरता थांबले आहे. त्यामुळे आमगाव नगर परिषद क्षेत्रातील मोहनटोला वॉर्डला शासनाच्या योजनांचा लाभ व मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे.