गोंदिया- जिल्ह्यातील प्रतापगडावरील भगवान शंकराची मूर्ती जळाल्याच्या घटनेवरून अर्जुनी-मोरगावसह नवेगाव बांध, केशोरी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. विशेष म्हणजे अर्जुनी मोरगावमध्ये आज भरणारा आठवडी बाजार देखील बंट ठेवण्यात आला. तसेच शिवसेनेच्यावतीने या घटनेचा निषेध करत सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
प्रतापगडावरील शंकराची मूर्ती जळाल्याच्या घटनेचे पडसाद; अर्जुनी मोरगावसह नवेगाव बांध, केशोरीत कडकडीत बंद - छत्तीसगड
गोंदियातील प्रतापगडावरील भगवान शंकराची मूर्ती जळाल्याच्या घटनेचे पडसाद परीसरात उमटले आहेत. अर्जुनी मोरगावसह नवेगाव बांध, केशोरी गावात सर्वपक्षीय बंद पाळण्यात आला.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील जंगल परिसरात प्रतापगड ही ऐतिहासिक पहाडी आहे. येथील प्रतापगड डोंगरावर गोंडकालीन किल्लाचे अस्तित्व आजही आहे. तसेच गडावर असलेले प्राचीन शिव मंदिर हे पंचक्रोशीतील शिवभक्तांचे श्रध्देचे स्थान आहे. त्यामुळे माजी खासदार नाना पटोले यांनी गेल्या २००३ मध्ये या पहाडीच्या टोकावर भाविकांच्या सहकार्याने भगवान शंकराची विशाल मूर्तीची स्थापना केली होती. या गडासमोर हाजी उस्मान गणी यांचा दरगाह आहे. त्यामुळे या दोन्ही श्रध्दास्थानवर हिंदू-मुस्लिम भाविक भक्तीभावाने एकत्र येतात. त्यामुळे हे स्थळ सामाजिक एकतेचे प्रतिक म्हणूनही ओळखले जाते.
प्रतापगडावर दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. जिल्ह्याच्या शेजारी असलेले छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातील भाविकही लाखोंच्या संख्येने हजेरी लावतात. अशातच याठिकाणची भगवान शंकराची मूर्ती जळाल्याची दुर्देवी घटना २६ जुलैला सकाळी उघडकीस आली होती. मूर्ती जळाल्याची वार्ता परिसरात पसरताच अनेक शिवभक्तांनी गडाकडे धाव घेतली. अधर्वट अवस्थेत जळालेली मूर्ती पाहून हा घातपाताचा प्रकार आहे की, निसर्गाचा कोप? अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. प्रशासनाने प्राथमिक तपासणी करून वीज पडल्यामुळे मूर्ती जळाल्याचे सांगितले होते. विशेष म्हणजे ही मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरीस व उच्च प्रतीच्या फायबरपासून तयार करण्यात आली होती. तर घडलेली घटना नैसर्गिक आपत्ती आहे किंवा घातपात आहे? याची सखोल चौकशी करून योग्य कारवाईची मागणी आज शिवसेनेने केली. तसेच सर्वपक्षीय बंद पाळण्यात आला.