गोंदिया - काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेना आक्रमक झाली आहे. एस.टी.महामंडळाच्या तिकिटातून अपघात विम्याच्या नावावर घेतले जाणारे पैसे मातोश्रीवर जातात असा आरोप नाना पटोलेंनी केला होता. या वक्तव्याच्या निषेधार्थ आज गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथे शिवसैनिकांनी मोर्चा काढत पटोलेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
शिवसैनिकांकडून नाना पटोलेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन - काँग्रेस
काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेना आक्रमक झाली आहे. पटोलेंनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथे शिवसैनिकांनी मोर्चा काढत पटोलेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
या घटनेमुळे गोरेगाव शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात सर्वच पक्षांच्या यात्रा निघाल्या आहेत. यातच काँग्रेसचे राज्य प्रचारप्रमुख नाना पटोले यांनी महापर्दापाश यात्रेत अमरावतीच्या सभेत प्रवासी विमा प्रकरणी शिवसेना विरोधी वक्तव्य केले होते. त्याचे पडसाद गोंदिया जिल्ह्यात उमटले.
अपमानास्पद आणि बदनामीकारक वक्तव्य केल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी गोरेगाव येथे शिवसैनिकांनी पटोले यांच्या विरोधात मोर्चा काढला. यावेळी त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे आणि फोटोचे दहन करण्यात आले. तसेच निषेधात्मक घोषणा देण्यात आल्या. या प्रकरणाने गोरेगाव शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नाना पटोले यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन केले जाईल असा इशारा शिवसैनिकांनी ठाणेदारांना दिलेल्या निवेदनात दिला.