गोंदिया - 'जीव मुठीत घेऊन प्रवास', याचा प्रत्यय गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा ते तुमसर या दोन तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या प्रवाशांना येत आहे. मागील वर्षभरापासून या मार्गावर रस्ते बांधणीचे काम सुरु आहे. परंतु, तरीही पावसाळ्यापूर्वी संबंधित विभागाने पाणी काढण्याचे नियोजन न केल्यामुळे पाणी थेट शेतकऱ्यांचा शेतात जाऊन शेतीची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. इतकेच नाही, तर या मार्गावर एसटी महामंडळाची बसदेखील बंद आहे. त्यामुळे यावरून प्रवास करणे प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
तिरोडा ते तुमसर या राज्य महामार्गाचे सिमेंट रस्ते बांधणीचे काम मागील वर्षभरापासून सुरु आहे. त्यामुळे तालुक्याचे अंतर कमी होऊन सुकर प्रवास होईल, असा येथील ग्रामस्थांचा विश्वास होता. मात्र, ऐन पावसाळ्यापूर्वी संबंधित कंपनीने पाणी काढण्याच्या उपाययोजना आधीच न केल्यामुळे त्याचा फटका या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना होत आहे. आता तर याची स्थिती आणखीनच बिकट झाली आहे. याठिकाणी पाण्याची निकासी न झाल्यामुळे वाहून जाणारे पाणी ऐन पेरणीच्यावेळी शेतकऱ्यांचा शेतात मोठ्या प्रमाणात साचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेती व प्रवास करावा कसा ? असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे.