महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक; चॉकलेटच्या आमिषाने नराधमाचा ६ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, संतप्त गावकऱ्यांनी . . . .

अंगणात खेळणाऱ्या चिमुकलीवर ३५ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्यामुळे खळबळ उडाली. त्यामुळे नागरिकांनी देवरी शहर बंद करत आंदोलन केले.

संतप्त गावकरी

By

Published : Jun 3, 2019, 8:57 PM IST

गोंदिया- अंगणात खेळणाऱ्या चिमुकलीला चॉकलेटचे आमिष देऊन नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना देवरी शहरात घडली. अश्विन मेश्राम, असे त्या नराधमाचे नाव आहे. घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी देवरी बंद ठेवून आंदोलन केले. त्यासह तहसील कार्यालयावर मोर्चा काढत या नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी गावकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली.

संतप्त गावकरी


देवरी शहरातील ६ वर्षीय चिमुकली आपल्या अंगणात शनिवारी सकाळी खेळत होती. यावेळी अश्विनने तिला चॉकलेटचे आमिष दाखवत आपल्या घरात नेले. त्यानंतर त्या चिमुकलीवर अत्याचार केला. अत्याचारादरम्यान चिमुकलीने आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.


परिसरातील नागरिक येताच अश्विनने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, गावकऱ्यांनी त्याचा पाठलाग केला. त्यामुळे अश्विनने एका ओळखीच्या घरात दडण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी त्याला पकडून चांगलीच 'समज' दिली. त्यानंतर संतप्त नागरिकांनी त्याला देवरी पोलिसांच्या ताब्यात देत तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ त्याच्यावर बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.


नराधम अश्विनला फाशिची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी आज देवरी शहर बंदची हाक दिली होती. यावेळी नागरिकांनी आरोपीला फाशीची शिक्षा द्या, पीडित चिमुकलीला न्याय द्या, हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याची मागणी तहसीलदार आणि पोलिसांकडे केली आहे. दरम्यान अश्विनला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ५ दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details