गोंदिया - आधुनिक जगात विज्ञान-तंत्रज्ञानाने कधी नव्हे तेवढी नेत्रदीपक प्रगती केली आहे. लोकोपयोगी चांगल्या कामांसाठी जेवढा या अत्याधुनिक यंत्र-तंत्राचा वापर केला जातो, किंबहुना तेवढाच अवैध कामांसाठी सुद्धा केला जातो. मात्र, अवैध कामासाठी जुन्या पद्धतीचा वापर चोरांनी केल्यामुळे त्यांच्यावर जप्तीची कारवाई करणे तहसीलदारांना चांगलीच महागात पडते. कधी नव्हे ती गोंदिया जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडली की, चक्क तहसीलदार व नायब तहसीलदारांना तब्बल 3 किमीपर्यंत 3 बैल जोड्यांना हाकत न्यावे लागले.
आपल्याला नेहमी ट्रॅक्टर-ट्राली, टिप्परने नदी-नाल्याच्या घाटावरून माफिया रेतीची तस्करी करीत असल्याचे तसेच अनेकदा त्यांच्यावर कारवाई करून दंड ठोठावण्यात आल्याचे ऐकायला बघायला किंवा वाचायला मिळते. मात्र, तिरोडा तालुक्यात असाही एक रेती चोरी प्रकरण घडले की प्रशासकीय अधिकार्यांना बैलांसह तब्बल 3 किमीची पायदळ वारी करावी लागली.
हे ही वाचा - मनसुख हिरेन हत्या प्रकरण : एटीएसने दमणमधून ताब्यात घेतली व्होल्वो कार
चार्या-पाण्याविना दिवसभर होत्या सर्जा-राजाच्या जोड्या -
दरम्यान बैलबंडीधारकांनी सोडण्याची विनंती तहसीलदारांना केली. पण तहसीलदारांनी आकारलेले शासकीय दंड भरून बैलबंड्या नेण्यास सांगितले. दंड भरण्यास पैसे नसल्यामुळे शेतकर्यांनी आपल्या मुक्या जनावरांचे दिवसभर चार्यापाण्याविना काय होईल, असा विचार करून बैलांना नेण्याची विनंती केली. तहसीलदारांनीही रेतीने भरलेल्या बंड्या ठेवून बैलांना नेण्यास सांगितले. मात्र शेतकर्यांनी आधी बैलांना सोडून परत त्यांना तिथेच आणून बांधून ठेवले व निघून गेले. या सर्व प्रकारामुळे सर्जा राज्याच्या तिन्ही जोड्या दिवसभर चार्या पाण्याविनाच आपल्या सुटकेची वाट पाहत तहसील कार्यालयाच्या आवारात बांधून होते.
बैलांमुळे प्रशासकीय अधिकार्यांना करावी लागली 3 किमीची पायदळ वारी -
तहसीलदार प्रशांत घोरुडे, नायब तहसीलदार नागपुरे, नायब तहसीलदार वरखडे व इतर कर्मचारी बाहेर आले. सायंकाळ होत होती. दिवसभर उपाशी असलेल्या बैलांना सोडण्यास सांगण्यात आले. त्यानंतर तहसीलदार, दोन्ही नायब तहसीलदार व इतर कर्मचार्यांनी बैलजोड्यांच्या मागोमाग पायी चालत ग्राम कवलेवाडा येथे त्यांच्या मालकांच्या घरी सोडून दिले. तिरोडा तहसील कार्यालय ते ग्राम कवलेवाडा दरम्यानचे अंतर जवळपास 3 किमी आहे. नेहमी चारचाकी वाहनांनी फिरणार्या प्रशासकीय अधिकार्यांना हा अंतर मात्र बैलांसह पायदळवारीनेच पूर्ण करावा लागला, हे विशेष. शेवटी प्रती बैलबंडी एक हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.