गोंदिया - देशात सर्वत्र नवरात्रीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. तर, जिल्ह्यातील खोडशिवणी येथे मात्र नवरात्री दरम्यान एक आगळीवेगळी परंपरा गेल्या १५० हुन अधिक वर्षांपासून जपली जात आहे. या गावात नवरात्री दरम्यान ७ दिवस अखंड हरिनाम सप्ताहाचा पाठ केला जातो. यावेळी गावातल्या हनुमान मंदिरात ७ दिवस अखंड ज्योत पेटवून भजन मंडळाकडून भजन गायले जाते. १६ भजन मंडळांपैकी प्रत्येक भजन मंडळ दीड तासाप्रमाणे भजन गायन करत असतात.
नवरात्रीच्या निमित्ताने सर्वत्र भक्तीमय वातावरण आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवणी येथे दरवर्षी नवरात्री उत्सवादरम्यान गावातील प्राचीन हनुमान मंदिरात घटस्थापनेच्या दिवशी ७ दिवस अखंड ज्योत पेटवून भजन-किर्तनाचा कार्यक्रम केला जातो. याठिकाणी १६ भजन मंडळ आहे. प्रत्येक भजन मंडळाला प्रत्येकी दीड तास भजन गाण्याकरिता देण्यात येतात व त्या भजन मंडळाचा अवधी संपताच क्षणातच खंड न पडू देता दुसरे भजन मंडळ आपले भजन गाण्यास सुरुवात करीत असते. अशाप्रकारे एकूण ७ दिवसांच्या अवधीत तब्बल १६८ तास भजन दरवर्षी या ठिकाणी गायल्या जात असून पूर्वजांपासून सुरु असलेली हि परंपरा आजही येथील हनुमान मंदिर समिती जपून आहे.