गोंदिया- जंगलातील समृद्धी आणि तलावाचे सौंदर्यीकरण गोंदिया जिल्ह्याला मिळाले आहे. जंगल व तलाव यांचा उपयोग करून जिल्ह्याला ताडोबा सारखे पर्यटन विकसित स्थळ करण्यासाठी वन विभागाच्या वतीने प्रयत्न करणार असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम, वने व आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी सांगितले. गोंदिया येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यमंत्री परिणय फुके पत्रकाराशी बोलताना फुके यांचा नुकताच राज्याच्या मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला आहे. मंत्रीमंडळ प्रवेशानंतर शनिवारी प्रथमच ते जिल्ह्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. गोंदिया जिल्ह्यात पर्यटन विकासाची क्षमता असतानाही आतापर्यंत त्याचा उपयोग झालेला नाही. देशातील ताडोबा व काना या दोन्ही मोठ्या व्याघ्र प्रकल्पांना जोडणारा दुवा म्हणून नवेगाव बांध नागझिरा यांना महत्त्व आहे. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना एक आठवड्यात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती फुके यांनी दिली.गोंदिया-भंडारा जिल्ह्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने नियमित कामे करण्यासाठी मोठी अडचण येत आहे. त्यामुळे सर्वात आधी मंत्रालय सचिवांशी चर्चा करून या दोन्ही जिल्ह्यातील रिक्त पदे त्वरित भरण्यासंदर्भात पुढाकार घेणार आहे. तसेच जिल्ह्यातील महत्त्वाची अडकलेली प्रकल्प कामे यांची यादी संबंधित अधिकाऱ्याकडून मागितली असून येत्या तीन महिन्यात त्या कामाची योग्य विल्हेवाट लावण्यात येईल, असंही त्यांनी यावेळी सांगितले.राज्याचे माजी समाजकल्याणमंत्री राजकुमार बडोले यांना पक्षाने मंत्रीपदावरून कमी केले नाही, तर व्यक्तीगत अडचणीमुळे आपण या पदावर काम करणार नसल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले होते. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आल्याचा गौप्यस्फोट फुके यांनी यावेळी केला.राज्यमंत्री पद आणि भंडारा जिल्ह्य़ाचे पालकमंत्री पद मिळाल्यानंतर फुके यांचे शनिवारी जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्याचे जंगी स्वागत केले.