गोंदिया - महावितरणतर्फे विद्युत बिलांची थकबाकी वसुली अभियान सुरू करण्यात आले आहे. २०२० ते २०२१ दरम्यान गोंदिया जिल्ह्यात १८२ कोटी रुपयांच्या वसुलीचे ‘टार्गेट’ ठेवण्यात आले आहे. तर या पैकी १६० कोटी रुपयांची वसुली आतापर्यंत करण्यात आली आहे. सध्यास्थितीला ३० कोटी रुपयाची वसुली अद्यापही बाकी आहे. वसुलीसाठी महावितरणकडून संपूर्ण जिल्ह्यात २०० वसुली पथक तयार केले असून त्यांच्या मार्फत वसुली मोहीम सुरु आहे. या अंतर्गत अनेक घरगुती वीज ग्राहकांसह शासकीय कार्यालयांचा वीज पुरवठाही खंडीत करण्यात आला आहे.
कोरोना महामारी काळात अनेकांनी वीज बिलांचा भरणा केला नाही. घरगुती वीज ग्राहकांच्या पाठोपाठ औद्योगिक, वाणिज्य, शासकीय कार्यालय, पाणी पुरवठा विभाग, दिवाबत्ती यासह शेतातील कृषिपंपाचेही वीज बिल थकले. त्यामुळे वीज वितरण कंपनीला मोठा आर्थिक फटका बसला. वीज निमिर्तीवरही याचा परिणाम होऊ लागला. दरम्यान, महावितरणतर्फे वीज ग्राहकांना वीज बिल भरणा करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. मात्र, कोविड काळातील वीज बिल माफ होणार या आशेपोटी अनेकांनी आपले वीज बिल भरले नाही. त्यामुळे प्रत्येक वीज ग्राहकांवर ५ ते ६ हजारांच्यावरचे वीज बिल थकीत आहे.