गोंदिया- बहीण-भावाच्या नात्यासाठी भाऊबीज व रक्षाबंधन असे दोन सण साजरे होतात. यातील रक्षाबंधन सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपल्याने घरोघरी आणि बाजारपेठेत आनंदी वातावरण तयार झाले आहे. शहरातील विविध भागात राख्यांनी दुकाने थाटण्यात आली असून लहान-मोठ्यांची उत्साहाने खरेदी सुरू झाली आहे.
आकर्षक राख्यांनी बाजारपेठ सजली ! बच्चे कंपनीला स्पायडरमॅन व छोटा भीमचे आकर्षण यंदा देशात हातांनी तयार होत असलेल्या राख्यांनाच मागणी जास्त आहे. बाजापेठेत रक्षाबंधनानिमित्त तीनशे ते चारशे आकर्षक असे राख्यांचे प्रकार विक्रीला आलेले आहेत. काही सामाजिक संस्थांनी राख्या तयार केल्या असून ते सुध्दा घरोघरी राख्या विक्री करीत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आकर्षक राख्या तयार करणा-या व्यापा-यांनी मोराच्या पिसापासून वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक राख्या तयार केल्या आहेत. या राख्यांना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पूर्वी लहान मुलांसाठी स्पंजचा वापर करून राख्या तयार केल्या जात. मात्र, त्या पध्दतीच्या राख्यांचे प्रमाण कमी झाले आहे.
रेशीमच्या राख्यांना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. राख्यामध्ये वेगवेगळे प्रकार उपलब्ध असले तरी यावेळी पर्यावरणाचा आणि पाणी वाचविण्याचा संदेश देण्याचा राख्या तयार करण्यात आल्या आहेत. शहरातील काही विद्यार्थ्यांनी राख्या तयार केल्या असून त्यांची विक्री संस्थांमार्फत केली जात आहे. यावर्षीचे खास आकर्षक म्हणून लहान मुलांसाठी भिंतीवर चढणारा स्पायडरमॅन, मिकीमाउस, डोनाल्ड डक, स्टोन राखी, डिस्को लाईट, जु जु वंडरबॉय, टेडी बेअर आदि राख्या लहान मुलांचे आकर्षण ठरल्या आहेत.
राखी तयार करण्यासाठी लागणा-या साहित्याच्या दरात यावेळी १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत राखीच्या किमती २ टक्यांनी वाढल्या आहेत. दोन रूपयापासून ते ५०० रूपये किंमतीच्या राख्या विक्रीला आहेत. सॅटिन रिबीन वापरून तयार केलेल्या तुळशींचे मणी, रूद्राक्षाचा वापर केलेल्या राख्या २० रूपये डझनपासून २०० रूपये डझनपर्यंत विक्री होत आहे.
बच्चे कंपनीसाठी कार्टुन्सची छबी असलेल्या, अन खेळणे असलेल्या राख्या उपलब्ध झाल्या आहेत. बाहुबली सिनेमाच्या नावाच्या राख्यादेखील उपलब्ध आहेत. तर लहान मुलांमध्ये आकर्षण असलेल्या स्पिनरच्या राख्यादेखील यंदा आकर्षण ठरत आहेत. तसेच छोटा भीम, भीम अॅण्ड बाल गणेश, भीम अॅण्ड फ्रेण्ड्स, टॉम अॅण्ड जेरी, अॅग्री बर्ड, डोरेमॉन, मोटु-पतलू या कार्टुन्स असलेल्या राख्याही उपलब्ध आहेत. काही राख्यांमध्ये बटण दाबले की लाईट लागते. छोट्यांच्या राख्यांची किमत ३० ते ६० रूपयापर्यंत आहे.