गोंदिया- तिरोडा वन विभागांतर्गत येत असलेल्या तिरोडा-खैरंलाजी मार्गावर बघोली शेतशिवारात उन्हाळी धान कापणीसाठी शेतकरी तथा सेवानिवृत्त पोलीस पाटील गेले होते. दरम्यान एका रानडुकराने त्यांच्यावर जबर हल्ला केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (24 मे) घडली. धनराज मोहन तुरकर (वय 68 वर्षे), असे मृताचे नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सध्या उन्हाळी धानपिकाच्या कापणीचे हंगाम सुरू आहे. बघोली येथील माजी पोलीस पाटील हे शेतकरी असल्याने धान पिकाची कापणी सुरू असल्याने गावापासून 2 किलोमिटर अतंरावरील आपल्या शेतात गेले होते. घरी परतताना रानडुकराने त्यांच्यावर हल्ला चढविला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर काही अंतरावर त्या रानडुकराचाही मृत्यू झाल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले आहे. तो रानडुकर ज्यास्त वयाचा असल्याने तुरकर यांच्यावर हल्ला केल्याने दोघांमध्ये झुंज झाली व दोघांना मोठ्या प्रमाणात इजा झाल्या व दोघांचा मृत्यू झाला.