गोंदिया - देशासाठी आपले प्राण गमावणाऱ्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कोल्हापूरचा एक तरूण सायकलवरून महाराष्ट्रभर फिरत आहे. अजित पाडूरंग दळवी असे त्या तरूणाचे नाव आहे. आपल्या या कामातून युवा तरुणांच्या मनामध्ये जवानांबद्दल आदर निर्माण व्हावा, हा दृष्टीकोण त्या तरुणाचा आहे.
अजित पांडुरंग दळवी हे कोल्हापूरातील एका बिल्डर कंपनीमध्ये वेल्डर वर्कर या पोस्टवर काम करतात. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र सायकलने फिरून हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली देण्याचे उद्धिष्ट समोर ठेवले आहे. महाराष्ट्रातील ३६ जिल्हे टप्याटप्याने गाठत हा प्रवास करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चार वर्षांपूर्वी अजित यांच्या डोक्यात विचार आला की, सीमेवर लढत असलेले सैनिक आमच्यासाठी आपले प्राण देतात. आम्ही सुरक्षित राहावे म्हणून शत्रूशी दोन हात करतात. अशा वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्याकरिता आपण काहीतरी करावं. या विचारानंतर चार वर्षांपासून त्यांनी याची तयारी केली. ते सद्या महाराष्ट्रभर फिरून हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहत आहेत.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तेथील हुतात्मा जवानांना ते श्रद्धांजली वाहतात. तसेच त्या जिल्ह्यातील तरुणांना वीर जवानाच्या प्रति आदर निर्माण व्हावा व युवकांनी देशासाठी काही तरी करावे, यासाठी ते प्रेरणा देत आहेत. सोमवार (ता. २८) रोजी ते गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथे पोहोचले. तेव्हा त्यांच्या महाराणा प्रताप चौक येथे सत्कार करण्यात आला. त्यांनी पंचायत समिती आवारात असलेल्या हुतात्मा स्मारक येथे जवानांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर गडचिरोलीकडे ते रवाना झाले.