गोंदिया- विदर्भात नागपूर पाठोपाठ आता गोंदिया जिल्ह्यातही २३ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. संबंधित तरुण थायलंडहून परतल्याची माहिती आहे. सुरुवातीला कोरोनाची कुठलीही लक्षणे नसलेल्या तरुणाला कोरोनाची लागण झाल्याने भीतीचे वातावरण आहे.
तरुण हा छत्तीसगड राज्यातील काही मित्र आणि नातेवाईकांसोबत थायलंडला फिरायला गेला असून तो १७ मार्चला गोंदियात दाखल झाला होता. मात्र, त्याला कोरोनाची कुठलीच लक्षणे नसल्याने त्याने कुठलीही तपासणी केली नाही. त्याच्याबरोबर गेलेल्या छत्तीसगढ येथील नातेवाईक आणि मित्रांना कोरोना झाल्याने तरुणाने २५ मार्चला गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जाऊन तपासणी केली. यानंतर सदर तरुणाला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. मात्र, कुठलीही लक्षणे नसतानाही त्याचे रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आल्याने गोंदिया आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.