गोंदिया - तिरोड्याच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयातील पर्यवेक्षिका तथा प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी अंजली गोविंदराव बावणकर व अंगणवाडी पर्यवेक्षिका उषा यशवंतराव आगासे, यांना 20 हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. लाभार्थ्यांच्या प्रशिक्षण शुल्काचे देयक तयार करून तिरोडा पंचायत समितीमध्ये पाठविण्याकरिता त्यांनी 21 हजार रुपयांची मागणी केली होती.
ही कारवाई आज (मंगळवार) दुपारी करण्यात आली. तक्रारदार हे आयजीएम कम्प्युटर एज्युकेशन नावाची संगणक संस्था चालवितात. जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत महिला व बालकल्याण विभागाकडून अनुसूचीत जाती-जमाती प्रवर्गातील मुलींना वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत संगणक प्रशिक्षण देतात. त्यांनी महाराष्ट्र ज्ञान महामंडळ पुणे येथे एकूण 35 लाभार्थ्यांचे प्रशिक्षण शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून त्यांना आपल्या संस्थेत 20 डिसेंबर 2020 पासून संगणक प्रशिक्षण देत आहेत.
तक्रारदाराकडे 21 हजार रुपयाची मागणी-
तक्रारदाराने 30 डिसेंबर 2020 रोजी लाभार्थ्यांच्या संगणक प्रशिक्षण शुल्क देयकाबाबत चौकशी करण्यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी बावणकर यांना फोनद्वारे संपर्क केला. त्यांनी 35 लाभार्थ्यांच्या संगणक प्रशिक्षण शुल्कचे देयक तयार करून पंचायत समिती तिरोडा येथे पाठविण्याकरिता तक्रारदाराकडे प्रती लाभार्थी 600 रुपये याप्रमाणे 35 लाभार्थ्यांचे एकूण 21 हजार रुपये रकमेची मागणी केली. ही लाच रक्कम देण्याची तक्रारदाराची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी कायदेशीर कारवाईसाठी 15 जानेवारी 2021 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे तक्रार नोंदविली.
आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल-
त्यानंतर 18 जानेवारी रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली. दरम्यान आरोपी बालविकास प्रकल्प अधिकारी बावणकर व आरोपी अंगणवाडी पर्यवेक्षिका आगासे यांनी 20 हजार रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आज 19 जानेवारी रोजी सापळा रचण्यात आला. कारवाईदरम्यान दोन्ही महिला आरोपींनी तक्रारदाराचे संगणक प्रशिक्षण शुल्काचे देयक तयार करून 20 हजार रुपयांची लाच पंचासमक्ष स्वीकारली. त्यावरून दोन्ही आरोपींविरुद्ध लोहमार्ग पोलीस ठाणे गोंदिया येथे कलम 7, लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 (सुधारित अधिनियम 2018) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा-काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी नाना पटोले यांचे नाव आघाडीवर; मात्र निर्णय लांबणीवर