गोंदिया :संपूर्ण जगामध्ये थैमान घातलेल्या कोरोनाला हरवण्यात गोंदिया जिल्ह्याला यश मिळाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले सर्व ६९ कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. बुधवारी अर्जुनी/मोरगावमध्ये असणाऱ्या जिल्ह्यातील शेवटच्या कोरोना रुग्णाला डिस्चार्ज मिळाला, आणि कोरोना हरला.
कोरोना विषाणूचा संसर्ग देशात पसरत असताना जिल्हा प्रशासनाने वेळीच सावध होऊन जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात केली. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी प्रशासनाने सर्व यंत्रणांना सोबत घेऊन सूक्ष्म नियोजन केले. उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली. याला सर्व नागरीक आणि लोकप्रतिनिधींची साथ मिळाली. त्यामुळेच आज जिल्हा कोरोनामुक्त झाल्याचे चित्र दिसत आहे.
कोरोनामुक्तीसाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी नागरिकांची साथ तर मिळालीच, सोबत आरोग्य विभागाने सर्व कोरोना बाधित रुग्णांवर काळजीपूर्वक उपचार देखील केले.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचतगटांनी कोविड केअर सेंटर येथे उपचार घेत असलेल्या सर्व रुग्णांना सकस आणि पोटभर जेवण दोन्ही वेळ दिले. त्यामुळे रुग्ण लवकर बरे होण्यास मदत झाली. रुग्णांनी देखील या आहाराबाबत समाधान व्यक्त केले.