गोंदिया -जिल्ह्यात ठिकठिकाणी शेळ्या चोरी करणार्या पाच जणांच्या आंतरराज्यीय टोळीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. शहील शहादत हुसेन (21), उडिया मोहल्ला खुर्शिपार, मिथुनकुमार श्रीरामचरण सिंग (26),सोनू उर्फ राकेश ध्यानसिंह सरदार (21), गोलू उर्फ आमीर मुबारक हुसेन (35) व सलमान कुरेशी असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. हे सर्व आरोपी छतीसगड राज्याच्या भिलाई येथील रहिवासी आहेत. तपासादरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चोरी गेलेले 2.90 लाख रुपये किंमतीचे 40 शेळ्या-बोकड जप्त केले आहेत. तर आरोपींना 2 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आरोपींनी दिली 8 गुन्ह्यांची कबुली -
चौकशी दरम्यान या आरोपींनी 8 गुन्ह्यांची कबुली दिली आहे.त्यात त्यांनी नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत 1, आमगाव 1, देवरी 2, सालेकसा 1, डुग्गीपार 1, अर्जुनी-मोरगाव ठाण्यांतर्गत 2 गुन्ह्यांचा समावेश आहे.