गोंदिया- जिल्ह्यात वनहक्कांतर्गत मिळालेल्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर सरकार, असा उल्लेख असल्याने धान्य खरेदी केंद्र सुरू होऊन दीड महिना उलटूनही शेतकऱ्यांचे धान्य खरेदी केले जात नाही. त्यामुळे धान्य खासगी व्यापाऱ्याला विकावे का, असा प्रश्न गोंदिया जिल्यातील वनहक्क कायद्या अंतर्गत शेती मिळालेल्या शेतकऱ्यांना पडला आहे.
जिल्ह्यातील 5 शेतकऱ्यांना बसतोय फटका
गोंदिया जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असून या जिल्हात मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. वनाशेजारी अनेक गावे वसली आहेत. अशा गावातील शेतकऱ्यांना रोजगाराचा साधन नसल्याने नाईलाजाने गावाशेजारी असलेल्या वन जमिनीवर शेतकऱ्यांनी शेती करायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्यावर वन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. हे प्रकरण पिढ्यानपिढ्या चालले. शेवटी शासनकडून या शेतकऱ्यांना वनपट्टे देण्यात आले. मात्र, अशा शेतकऱ्यांना वनपट्टे मिळाले असले तरी त्यांच्या सातबाऱ्यावर सरकार, असा उल्लेख आहे. त्यामुळे मागील दीड महिना होऊन सुद्धा त्यांच्या धान्याची खरेदी केली जात नाही. एकट्या देवरी तालुक्यात 1 हजार 37 शेतकरी आहेत. तर संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला तर 5 हजारांच्या जवळपास शेतकरी आहेत.