गोंदिया - तुम्ही आत्तापर्यंत माणूस, म्हैस, गाय तसेच बैलांवर लसीकरण करताना बघितले असेल. मात्र, जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय गोंदियाच्यावतीने २२ जानेवारी रोजी चक्क श्वानांच्या मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शेकडो श्वानमालकांनी श्वानांना शिबिरात आणून त्यांचे लसीकरण करवून घेतले.
आपल्याला जगभरात श्वानप्रेमी दिसून येतील. गोंदिया जिल्ह्यात देखील देशी आणि विदेशी विविध प्रजातीचे श्वान पाळणारे अनेक नागरिक आहेत. या श्वानांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी श्वानमालकही विशेष काळजी घेतच असतात. यातच आता जिल्हा पशुवैधकीय विभागाच्या वतीने देखील श्वानांसाठी लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग असून याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. श्वान रोगमुक्त व्हावे, यासाठी ही मोहीम राबवण्यात आली आहे.