गोंदिया - जिल्ह्याच्या आमगाव येथील किंडकीपार परिसरात आज सकाळी ९ ते १० वाजण्याच्या सुमारास पाण्यासाठी भटकंती करत एक चितळाचे पिल्लू आले. जंगलातून किंडकीपार येथील मंगरू श्यामकुवर यांच्या अंगणात एका कोपऱ्यात दडून बसले होते. मंगरू यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलीस-पाटील यांना माहिती दिली.
पाण्याच्या शोधात गावात आले चितळाचे पिल्लू; उपचार करत वनविभागाने सोडले जंगलात - गोंदियाच्या बातम्या
आज सकाळी ९ ते १० वाजण्याच्या सुमारास पाण्यासाठी भटकंती करत एक चितळाचे पिल्लू आले. जंगलातून किंडकीपार येथील मंगरू श्यामकुवर यांच्या अंगणात एका कोपऱ्यात दडून बसले होते. मंगरू यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलीस-पाटील यांना माहिती दिली.
पोलीस पाटलांनी आमगाव वनविभागाला याची माहिती दिली. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत त्याला ताब्यात घेऊन पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली. डॉक्टरांनी पिल्लू सुस्थितीत असल्याचे सांगितल्यानंतर वनविभागाकडून त्याला मानेगावच्या जंगलात सोडून देण्यात आले.
आमगाव तालुक्याजवळ मानेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल परिसर व गवताळ भाग असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात चितळ असतात. अनेकदा विविध प्राणी याप्रकारे पाण्याच्या शोधात मानवी वस्तीत येत असतात. त्यासाठी वनविभागाने जंगल भागात पाणवठे तयार करण्याची मागणी नागरिक करत आहेत.