गोंदिया- भारतीय जनता पक्षाच्या मेगाभरतीच्या माध्यमातून गोंदिया येथील काँग्रेसचे आमदार आणि ज्येष्ठ नेते गोपालदास अग्रवाल यांचा नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश झाला आहे. ऐन निवडणूकीच्या तोंडावर गोपालदास अग्रवाल यांच्यासारख्या काँग्रेसच्या दिग्गज नेत्याने पक्षाला रामराम ठोकल्याने विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे. गोपालदास अग्रवाल यांच्या समवेत काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते देखील भाजपवासी झालेले आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपालदास अग्रवाल यांनी नागपूर येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गोपालदास अग्रवाल यांनी गोंदिया जिल्ह्यात तब्बल 27 वर्षे काँग्रेसचे काम केले आहे. गोपालदास अग्रवाल हे भाजपमध्ये प्रवेश करतील या संदर्भातील चर्चा जोर धरत असताना भारतीय जनता पक्षाने विदर्भातील काँग्रेस नेत्यांना प्रवेश देण्याचे टाळल्याने गोपालदास अग्रवाल यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडला होता. मात्र सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गोपालदास अग्रवाल यांचा पक्ष प्रवेश झाला आहे.
अग्रवाल यांच्या सोबत गोंदिया येथील शेकडो कार्यकर्त्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश घेण्याआधी गोपालदास अग्रवाल यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांना पाठविला आहे. तर काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाध्यक्ष सोनिया गांधीकडे पाठवला आहे.
हेही वाचा - ठाकरे कुटुंबातील सदस्य पहिल्यांदाच लढणार निवडणूक; आदित्य यांनी केली घोषणा
गेल्या अनेक महिन्यापासून गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आमदार अग्रवाल यांच्या तळ्यातमळ्यात राजकारणाचे वादळ चांगलेच घोंगावत होते. यामुळे अग्रवाल यांच्या भूमिकेमुळे जिल्ह्यात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपमधील नेते सुद्धा कमालीचे अस्वस्थ झाले होते. परंतु, भाजपच्या वरिष्ठ स्तरावर अत्यंत नियोजनबद्धरीत्या खिचडी शिजत असताना विधानसभेची निवडणूक लागण्यापूर्वी काँग्रेससह भाजपच्या नेत्यांची सुद्धा धाकधुक वाढविण्यात आली होती. शेवटी सोमवारी आमदार अग्रवाल यांनी या सर्व परिस्थितीवर मात करून भाजपमध्ये आपली जागा पक्की करत काँग्रेसला राम राम ठोकला आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नागपूर येथे भाजपमध्ये प्रवेश केला आहे
हेही वाचा - चंद्रकांत पाटलांच्या अडचणीत वाढ, उमेदवारीला ब्राह्मण महासंघाचा विरोध
उल्लेखनीय म्हणजे गेली 27 वर्षे आमदार अग्रवाल यांनी काँग्रेसच्या छायेत आपले राजकारण शिखरावर नेले होते. अग्रवाल हे दोन वेळेस विधानसभा सदस्य राहिले व तीन वेळेस गोंदिया विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसच्या तिकिटावरून आमदारही राहिले आहेत. मात्र, त्यांनी काँग्रेसला राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला तर गोंदिया विधानसभा क्षेत्राची उमेदवारी गोपालदास अग्रवाल यांना मिळणार का? याकडे गोंदिया विधानसभा क्षेत्रातील लोकांच्या नजरा लागलेल्या आहेत.