गोंदिया - अर्जुनी-मोरगाव येथे पती-पत्नीचे भांडण सुरू होते. मुलगा आला आणि तुम्ही भांडण करू नका असे म्हणाला. त्यावरून बापाने त्याला शिवीगाळ करणे सुरू केले. तेव्हा मुलाच्या मामाने येवून तू भाचाला शिवीगाळ करू नको, असे म्हणाले. मात्र क्रोधित झालेल्या भावजीने भांडण मिटवणाऱ्या मेव्हण्याच्या पोटात चाकू भोसकून त्याचा खून केला. ही घटना मंगळवारी दुपारी 2.30 वाजता केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत घडली.
आरोपी अब्दुल कादीर रशीद शेख मृताच्या पत्नीची तक्रार
अब्दुल कादीर रशीद शेख (वय 52) रा. प्रतापगड याने गौस मोहंमद अजीज मोहंमद शेख (वय 52) रा. प्रतापगड याचा खून केला. मृताची पत्नी नाजिया शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, तिचे पती जन्मापासून प्रतापगड येथेच राहतात. त्यांना दोन मुली असून त्यांचे लग्न झाल्याने त्या आपआपल्या सासरी राहतात. मृताच्या घराशेजारीच त्याची बहीण सलमा कादीर शेख, भावजी कादीर रशीद शेख व भाचा आरीफ शेख मागील 23 वर्षांपासून राहतात.
चाकूने भोसकले
मंगळवारी 1 जून, दुपारी 2.30 च्या सुमारास कादीर शेख व त्यांची पत्नी सलमा यांच्यामध्ये पैशावरून भांडण सुरू झाले. मुलगा आरीफ बाहेरून आला व आपल्या वडिलांना तू कशाला पैसे मागतोस असे बोलला, मात्र कादीरने तू येथून निघून जा, असे बोलल्याने मुलगा बाहेर चौकाकडे निघून गेला. परंतू कादीर शेखचे पत्नी व मुलाला शिवीगाळ देणे सुरूच होते. यावर कादीरचा मेव्हणा त्यांच्या अंगणात येवून कशाला शिवीगाळ करतोस, असे बोलला. मात्र कादीरने उलट त्यांनाच मारझोड करणे सुरू केले. तसेच कमरेखाली लपवून ठेवलेला चाकू काढून आपल्या साळ्याच्या पोटात भोसकला, त्यातच तडफडत त्याचा मृत्यू झाला. मृतकाच्या पत्नीच्या तक्रारीवरून कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पोलीसांच्या ताब्यात असून पुढील तपास ठाणेदार संदीप इंगळे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. केशोरी पोलीसांनी आरोपी अब्दुल कादीर रशीद शेख यास ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा- पुलवामा येथे दहशतवाद्यांनी भाजप नेत्याची गोळ्या झाडून केली हत्या