गोंदिया - अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गोंदियाला येत असलेल्या अंगणवाडी सेविकांची स्कॉर्पिओ आणि एसटीबसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात १२ अंगणवाडी सेविका जखमी झाल्या आहेत. संबंधित घटना सालेकसा तालुक्यातील जांभूर टोल नाक्याजवळ घडली आहे. या अपघातात ६ महिलांना गंभीर इजा झाली असून, ६ जणी किरकोळ जखमी आहेत. अपघातग्रस्त महिलांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर काही महिलांची स्थिती चिंताजनक असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आहे.
गोंदियात स्कॉर्पिओ-एसटी बसची समोरासमोर धडक; १२ अंगणवाडी सेविका जखमी - road accident
अपघातात १२ अंगणवाडी सेविका जखमी झाल्या आहेत. गोंदियातील आंदोलनात सहभागी होण्यासाठी येत असताना घटना घडली असून, ६ महिला गंभीर जखमी आहेत.
अंगणवाडी सेविकांचे आंदोलन शनिवारी गोंदियात आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पदमपूर परिसरातील १२ अंगणवाडी सेविका एम. ०६ बी. ई. ०७१३ क्रमांकाच्या स्कॉर्पिओने गोंदियाला जात होत्या. चालक हेमंतकुमार डोये (वय २५, रा. पदमपूर) याने साखरीटोला ते ठाणामार्गे वाहन काढले. जांभूरटोला चौकातून जात असताना चालकाचे स्टिअरिंगवरून नियंत्रण सुटल्याने गाडी विरूध्द दिशेने येणा-या एसटी बसवर आदळली.
या अपघातात उर्मिला भोजराज वालदे (वय ४८, रा. परसोडी, देवरी), स्वरूपा ओमप्रकाश कोराम (वय ४५, रा. गडेगाव, धुंदीटोला), मीरा दुकुराम कोराम (वय ३०, रा. परसोडी, धमडीटोला), मनोरमा जयराम साखरे (वय ५४, रा. बोलगाव), कौतुका केशवराव सोनवाने (वय ६३, रा. परसोडी), (रा. पदमपूर) यांच्यासह अन्य आठ महिला जखमी झाल्या आहेत. जखमींना गोंदियाच्या केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.