गोंदिया- नक्षलवाद्यांनी गोंदिया जिल्ह्यातील मिसपिरी या गावची २०११ मध्ये ग्रामपंचायत जाळली होती. या आगीत नागरिकांचे दाखले व जुने दस्तावेज जळून खाक झाले होते. या घटनेला ८ वर्षे झाली आहेत. तरीही प्रशासनाने याची दखल न घेतल्यामुळे स्थानिक पातळीवर दाखले मिळण्यास अडचण होत आहे. त्यामुळे मिसपिरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तब्बल ७ गावातील ३ हजारहून अधिक नागरिकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबरोबरच आगामी विधानसभा निवडणुकीवरही बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.
गोंदियातील ७ गावांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
प्रशासनाने याची दखल न घेतल्यामुळे स्थानिक पातळीवर दाखले मिळण्यास अडचण होत आहे. त्यामुळे मिसपिरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तब्बल ७ गावातील ३ हजारहून अधिक नागरिकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
गोंदिया जिल्ह्यात आता नक्षलवादी हल्ले कमी झाले आहेत. मात्र, भुतकाळात घडलेल्या घटना येथील नागरिकांच्या भविष्यावर विपरीत परिणाम करत आहेत. जिल्ह्यातील देवरी तालुक्यांतर्गत येणाऱ्या मिसपिरी या अतिदुर्गम व १०० टक्के नक्षलग्रस्त असलेल्या गावात ३ नोव्हेंबर २०११ ला नक्षल्यांकडून ग्रामपंचायतीला आग लावण्यात आली होती. या आगीत या गावासह आजूबाजूच्या ७ गावातील ग्रामस्थांचे आवश्यक दस्तावेज व इतर सामग्री जळून खाक झाली होती.
घटनेनंतर याबाबतची सूचना ग्रामस्थांनी स्थानिक अधिकाऱ्यांना व जनप्रतिनिधींना दिली होती. मात्र, आज तब्बल ८ वर्षानंतरही नागरिकांचे आवश्यक दस्तावेज तसेच इतर माहिती ग्रामपंचायतीमध्ये नसल्यामुळे येथील नागरिकांना अनेक अडचणी येत आहेत. आगीत नागरिकांच्या उपयोगी पडणारे जन्म-मृत्यू नोंदवही तसेच इतर महत्त्वपूर्ण दस्ताऐवज जळून नष्ट झाले. ग्रामस्थांच्या मागणीवरून अंगणवाडी शाळेचे दाखले व आरोग्य विभागाच्या नोंदणीनुसार जन्म-मृत्यूचे दस्ताऐवज तयार करून व ग्रामसभेची मंजुरी घेऊन २८ डिसेंबर २०१५ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत मुंबई मंत्रालयात पाठविण्यात आले. परंतु त्या प्रस्तावाला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही.