गोंदीया - कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये याकरता लॉक डाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागातील गोरोगरीबाना वेळेत उपचार मिळू शकत नाहीत. याचा प्रत्यय गोंदिया जिल्ह्यातील दरेकसा येथील जिल्हा परिषद शाळेत 4 थीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या बाबतीत आला. आंचल शेषराम बारसागडे (वय 11) या विद्यार्थिनीचा डेग्यू आजाराने मृत्यू झाल्याची घटना 20 एप्रिलला रात्री घडली. तिचे कुटुंबीय लॉक डाऊनमुळे हैदराबाद येथे अडकले आहेत.
कोरोना विषाणूचा संसर्ग संपूर्ण जगात पसरत आहे. देशात आणि राज्यात देखील या विषाणूचे हजारो रुग्ण आहेत. या विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्याच्या उद्देशाने शासनाने लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालये, आस्थापना, रोजगार सर्वच बंद आहेत. दर्रेकसा येथील जिल्हा परिषद शाळेत आंचल शेषराम बारसागडे ही विद्यार्थिनी इयत्ता 4 थीच्या वर्गात शिकत होती. तिला डेंग्यू आजार झाला होता. हातात पैसा नाही आणि बाहेर पडण्यास साधन नाही, अशा अवस्थेत त्या विद्यार्थिनीचा औषधोपचाराच्या अभावामुळे मृत्यू झाला. आंचलचे आई-वडील, मोठे बाबा असे संयुक्त कुटुंब आहे. तिचे मोठे बाबा आणि काका-काकू रोजगाराच्या शोधात हैदराबाद येथे गेले होते. तिचे वडील आणि आई घरीच होते. आई-वडिलांखेरीज इतर कुटुंबीय हैदराबाद येथे लॉक डाऊनमुळे अडकून पडले आहेत. अशा अवस्थेत आंचलचा मृत्यू झाल्याने तिचे कुटुंबीय आणि गावात शोककळा पसरली आहे.