गोंदिया - संततधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांतील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोबतच मध्य प्रदेशातील संजय सरोवर धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आल्याने वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिणामी गोंदिया जिल्ह्यातील २० गावांना पुराने वेढा घातला असून तेथील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक मार्ग बंद पडले आहेत. राष्ट्रीय महामार्गावरदेखील चार फूट पाणी साचले आहे. 1994 नंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचल्याने वाहूतक पूर्णतः ठप्प झाली आहे.
वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदी काठावरील अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. तिरोडा तालुक्यात गेले तीन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे नदी, तलाव व धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत सतत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चांदोरी खुर्द, पिपरिया, ढिवरटोली, बोंडराणी, किडंगीपार, मुरदाडा, महालगाव, धापेवाडा, करटी खु. या गावांमध्ये पाणी शिरले आहे. येथील जनजीवन विस्कळीत झाले असून हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. किंडगीपार व ढिवरटोली येथील 96 लोकांना आपत्ती निवारण पथकाने पाण्यातून बाहेर काढले आहे.