गडचिरोली - मोहफूल वेचण्यासाठी जंगलात गेलेल्या वृद्ध महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना शुक्रवारी सकाळी आरमोरी तालुक्यातील इंजेवारी जंगल परिसरात घडली. सिंधू ऋषी बोरकुटे (52) रा. गणेशपूर असे मृत महिलेचे नाव आहे.
मोहफूल वेचताना वाघाचा हल्ला, महिला ठार - tiger attack
मोहफूल वेचण्यासाठी जंगलात गेलेल्या वृद्ध महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले.
सिंधू बोरकुटे या रोजप्रमाणे मोहफूल संकलन करण्याकरिता जंगलामध्ये गेली होती. तेव्हा वाघाने अचानक हल्ला करून महिलेला जागीच ठार केले. त्यानंतर मृतदेह घटनास्थळापासून 40 ते 50 मीटर अंतरावरील सिर्सी नजीकच्या वांद्री नाल्यावर फरफटत नेले. ही घटना लक्षात येताच आजूबाजूचे नागरिक आरडाओरड केल्यामुळे वाघाने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.
घटनेची माहिती मिळताच आरमोरी वनपरिक्षेत्र अधिकारी डोंगरवार, वनरक्षक शेंडे व वन कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाचा पंचनामा करून महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या घटनेमुळे आजूबाजूच्या सिरसी, गणेशपुर, कोजबी, इंजेवारी परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली आहे.