गडचिरोली- जिल्ह्यात दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. दक्षिण गडचिरोली जिल्ह्याला काल रात्री वादळी पावसाने झोडपून काढले. या पावसाचा सर्वाधिक फटका रब्बी पिकांना बसला आहे. काल सकाळपासून पडणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रमाणात नुकसान झाले आहे.
गडचिरोली जिल्ह्याला वादळी पावसाचा सर्वाधिक फटका; कापूस, मिरचीसह रब्बी पिकांना फटका - कृषी
ढगाळ वातावरणामुळे तूर, हरभरा या रब्बी पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी धान करेदी केंद्रांवर आणलेल्या धानालाही भिजल्याने कोंब फुटू लागले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकणी वादळी पाऊस पडला. या पावसाचा सर्वाधिक फटका अहेरी आणि सिरोंचा तालुक्याला बसला. जिल्ह्यात सिरोंचा तालुका हा एकमेव मिरची व कापूस उत्पादक तालुका आहे. या वादळी पावसाने मिरचीचे हातात आलेले पीक मोठया प्रमाणात उध्वस्त झाल्याने मिरचीसह इतर पिके घेणारा शेतकरी अडचणीत सापडला आहे.
कापुस आणि मिरची ही नगदी पीके असून आता कापणीसाठी आले असताना पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. अंकीस, आसरल्ली भागात तोडून शेतात वळण्यासाठी टाकलेले मिरची अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतातच ओली झाली. ढगाळ वातावरणामुळे तूर, हरभरा या रब्बी पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी धान करेदी केंद्रांवर आणलेल्या शेतकऱ्यांच्या धानालाही भिजल्याने कोंब फुटू लागले आहे. मेडीगड्डा प्रकल्पामुळे नदीकाठावरील शेतकरी अडचणीत असताना या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना आणखी हादरा बसला आहे.
वीटभट्टी व्यवसायकांचेही पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.