गडचिरोली -जिल्ह्यात 21 एप्रिल रोजी सायंकाळी वादळी वारा, पावसामुळे झाड पडले. तसेच मेघगर्जनेने विविध ठिकाणी पिन इन्सुलेटर (वीजरोधक) फुटल्याने जिल्ह्यातील जंगलव्याप्त भामरागड तालुक्यातील वीज खंडित झाली होती. याच्या दुरुस्तीसाठी तब्बल 30 तास म्हणजे दुसऱ्या दिवशी रात्री दीड वाजेपर्यंत वीज खंडित होती. त्यामुळे संपूर्ण भामरागड तालुका अंधारात होता.
यासाठी एटापल्ली भामरागडचे 2 अधिकारी व 22 कर्मचाऱ्यांना दिवस-रात्र काम करावे लागले. तेव्हा भामरागड तालुक्याचा वीजपुरवठा सुरळीत झाला. कोरोनाच्या दहशतीतही कर्मचाऱ्यांची अविरत सेवा सुरू असल्याचे पाहायला मिळाले.
मानवी साखळी तोडून कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 1 मे पर्यंत संचारबंदी जाहीर केली आहे. या कालावधीत कोरोनाच्या दहशतीत बहुतांश जनता घरीच बसून आहे. मात्र 21 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान मेघगर्जनेसह आलेल्या वादळी पावसामुळे वीज खंडित झाली. यामुळे एटापल्ली भामरागड वीज वाहीनीवर कांदोळी बूर्गी मध्यात झाड पडले. 10 ते 12 ठिकाणी पिन इन्सुलेटर (वीजरोधक) फुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे एटापल्लीचे वीज वितरण उपकार्यकारी अभियंता हितेश मडामे व 10 कर्मचारी कामाले लागले. मात्र अनेक ठिकाणी हीच समस्या होती. त्यामुळे भामरागडचेही उपकार्यकारी अभियंता सचीन काळे यांच्यासोबत लाईनमेन पंकज मेश्रम, संदीप गाघरगुंडे, नदीम शेख, शशिकांत ढोलेसह कर्मचाऱ्यांनी 22 एप्रिलच्या रात्री दीड वाजेपर्यंत जंगलात राहुन इन्सुलेटरचे काम पूर्ण केले. तब्बल 30 तासानंतर भामरागडचा वीजपुरवठा सुरळीत झाला. कोरोनाच्या दहशतीत सर्व नागरिक घरी बसले असले, तरी आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी रात्रभर जंगलात राहुन वीज कर्मचारी व अधिकाऱ्यांनी महत्त्वाचे काम केले. रात्र झालीय, उद्या पाहू, असे सांगून वेळ काढणारे अधिकारी राहिले असते तर आणखी 24 तास भामरागड अंधारात राहीले असते. म्हणून कर्तव्यदक्ष अधिकारी प्रामुख्याने भामरागडचे उपकार्यकारी अभियंता सचिन काळे, एटापल्लीचे उपकार्यकारी अभियंता हितेश मडावी यांच्यासह सर्वांचे काम महत्वाचे ठरले. अशा दहशतीच्या कालावधीतही वीज कर्मचारी स्वतः ला वाहुन घेत आहेत, हे यातून दिसत आहे.
क्षणभरही वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांचा जीव कासावीस होतो. थोडावेळ वीज आली नाही तर मनाचा संयम सुटतो. यावरून जीवनात वीज किती महत्त्वाची आहे, हे लक्षात येते. ऊन, थंडी वादळ- वारा, पाऊस अशा नैसर्गिक आपत्तची तमा न बाळगता वीज पुरवठा सुरळीत न राहिल्यास यासाठी वीज कर्मचारी जीवाची पर्वा न करता काम करत राहतात. कोरोना काळात प्रशासकीय यंत्रणांमध्ये आरोग्य विभाग, नगर पंचायत, नगरपालिका व पोलिसांचे स्थान अग्रस्थानी आहे. मात्र, वीज कर्मचाऱ्यांच्याही कामाला दुर्लक्षित करुन चालणार नाही. दिवस-रात्र दुरुस्तीचे काम करुन सर्वाना प्रकाश देण्याचा प्रयत्न वीज कर्मचारी करत आहेत. त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे.