गडचिरोली- गेल्या बारा तासात गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी दोन हल्ले केले आहेत. विशेष म्हणजे आज राज्यात महाराष्ट्र दिनाचा उत्साह असताना या हल्ल्यांनी त्यावर विरजन टाकले आहे. राज्यभर महाराष्ट्र दिन साजरा होत असताना मंगळवारी रात्री सशस्त्र नक्षल्यांनी रस्त्याच्या कामावरील तब्बल २७ वाहने जाळली व त्यानंतर लगेच आज दुपारी नक्षल्यांनी पोलीस दलाच्या दोन गाड्यावर भुसुरूंग स्फोटाने हल्ला केला. यात १५ पोलीस गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यामुळे आजचा दिवस हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस आहे.
पहिल्या हल्ल्यात नक्षल्यांनी २७ वाहने जाळली -
पुराडा-मालेवाडा-येरकड या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १३६ चे काम सुरु आहे. हे काम दुर्ग येथील अमर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीद्वारे करण्यात येत आहे. या कंपनीचा दादापूर येथे गावाशेजारीच डांबर प्लांट असून, दोन कार्यालयेही आहेत. तेथे अनेक वाहने उभी होती. मंगळवारी रात्री दीडशेहून अधिक सशस्त्र नक्षली दादापूर येथे गेले. त्यांनी संपूर्ण गावभर शासनविरोधात मजकूर लिहिलेले बॅनर लावले आणि नंतर वाहने व अन्य यंत्रसामग्रीला आग लावली.
दुसऱया हल्ल्यात नक्षल्यांनी पोलीस दलाच्या गाड्यांवर हल्ला -
गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी शीघ्र कृती दलाच्या जवानांच्या दोन वाहनांवर मोठा हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत १५ जवान गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.यामध्ये एका खासगी वाहन चालकाचाही समावेश आहे. दोन वाहनांमध्ये २५ जवान होते. त्यामुळे या दोन घटनांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.