महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिकांवरील धोकादायक किडीचा 'ट्रायकोग्रामा' मित्रकिड करणार नायनाट, कृषी विभागाने केली उत्पत्ती - farmer

ट्रायकोग्रामा हे परोपजीवी कीटक शेतामध्ये सोडले असता ते पतंगवर्गीय हानिकारक किडींची अंडी शोधून त्यात आपली अंडी घालतात. ही अंडी १६ ते २४ तासात उबवतात. या अंड्यातून निघालेली ही ट्रायकोग्रामाची अळी हानीकारक किडीच्या अंड्यातील गर्भाचा भाग खाऊन ते ४ दिवसात कोषावस्थेत जाते. अशा प्रकारे अंडी, अळी व कोश या तिन्ही अवस्था हानीकारक किडीच्या अंड्यातच पूर्ण होतात आणि नुकसान करणारी अळी तयारच होत नाही.

'ट्रायकोग्रामा' मित्रकिटकाची गडचिरोली कृषी विभागाने केली उत्पत्ती

By

Published : Nov 25, 2019, 1:37 PM IST

गडचिरोली - पाऊस चांगला पडला तरीही रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतपिकाचे मोठे नुकसान होत आहे. पिकाला लागलेली किड ही जवळ-जवळ पूर्ण शेत उद्ध्वस्त करून टाकते. मात्र, आता शेतकऱ्यांना घाबरण्याची गरज नाही. गडचिरोलीच्या कृषी विभागाने पीक उध्वस्त करणाऱ्या किडींचा नायनाट करण्यासाठी प्रथमच 'ट्रायकोग्रामा' या मित्रकिड्यांची उत्पत्ती केली आहे. हे 'मित्रकिड' मुलचेरा येथील शेतकरी उत्पादक कंपनीच्या लॅबमध्ये तयार करण्यात आले असून ते पीक उद्ध्वस्त करणाऱ्या किडीचा प्रसार थांबवून तिला भक्ष्य करणार आहेत.

'ट्रायकोग्रामा' मित्रकिटकाबाबत सांगताना अधिकारी

परोपजीवी किडींपैकी 'ट्रायकोग्रामा' हा एक अत्यंत महत्वाचा मित्रकिटक आहे. हानिकारक किडींच्या बंदोबस्तासाठी 'ट्रायकोग्रामा' हा परोपजीवी कीटक सरस ठरला आहे. हा कीटक गांधीलमाशीच्या जातीचा असून आकाराने अतिशय लहान आहे. त्याची लांबी 0.4 ते 0.7 मिमी तर जाडी 0.15 ते 0.25 मिमी इतकी आहे. ट्रायकोग्रामा हे परोपजीवी कीटक शेतामध्ये सोडले असता ते पतंगवर्गीय हानिकारक किडींची अंडी शोधून त्यात आपली अंडी घालतात. ही अंडी 16 ते 24 तासात उबवतात. या अंड्यातून निघालेली ही ट्रायकोग्रामाची अळी हानीकारक किडीच्या अंड्यातील गर्भाचा भाग खाऊन ते 4 दिवसात कोषावस्थेत जाते. ही कोषावस्था 2 ते 4 दिवसात पूर्ण होते. अशा प्रकारे अंडी, अळी व कोश या तिन्ही अवस्था हानीकारक किडीच्या अंड्यातच पूर्ण होतात. त्यानंतर अंड्याला छिद्र पडून ट्रायकोग्रामाचे प्रौढ बाहेर पडतात आणि परत हे प्रौढ ट्रायकोयामा हानिकारक पतंगवर्गीय किडीच्या अंड्याचा शोध घेवून त्यावर परोपजिविका करतात. यामुळे नुकसान करणारी अळी तयारच होत नाही. या उपक्रमाची नुकतेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या चमूने पाहणी केली.

हेही वाचा - कौतुकास्पद ! अशिक्षित आदिवासींनी बनवले विना नट बोल्टचे 'मासेमारी यंत्र'

ट्रायकोग्रामाचे जीवनचक्र 8 ते 10 दिवसात पूर्ण होते. हिवाळ्यात 9 ते 12 दिवसही लागतात, ट्रायकोग्रामा, किडीच्या अंड्यामध्ये आपली अंडी घालत असल्यामुळे नुकसान करणारी अळी तयारच होत नाही. त्यामुळे पतंगवर्गीय किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा फार उपयोगी आहे. ही मित्रकिड कपाशीवरील बोंडअळी, मक्यावरील खोडकिडा, सुर्यफुलावरील अळी, टोमॅटोवरील फळ पोखरणारी अळी, भात पिकावरील खोडकिडा, ज्वारीवरील खोडकिडा, कोबीवरील ठिपक्याचा पतंग इत्यादी किडींवर प्रभावी ठरतात.

हेही वाचा - लाच घेताना मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

ट्रायकोकार्ड हे प्रखर सूर्यप्रकाश, अग्नी, किटकनाशके, मुंग्या व पालीपासून दूर ठेवावेत, सकाळी अथवा सायंकाळीच शेतात लावावे, शेतामध्ये ट्रायकोग्रामा सोडण्यापूर्वी व सोडल्यानंतर हानिकारक किटकनाशकांची कमीत-कमी 10 ते 15 दिवसांपर्यत फवारणी करणे टाळावे. कृषी विभागाने उत्पत्ती केलेले 'ट्रायकोग्रामा' मित्रकिड अत्यल्प दरात शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जात असल्याची माहिती गडचिरोलीच्या उपविभागीय कृषी अधिकारी प्रिती हिरलकर व आत्माचे मुलचेरा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आकाश लवटे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -गडचिरोलीत मलेरियाने घेतला मुलाचा बळी, नातेवाईकांनी केला डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details