महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जांभुळखेडा भूसुरुंग स्फोटप्रकरणी आणखी तिघांना अटक; आरोपींची संख्या सातवर

सोमनाथ दलसाय मडावी (वय 38), किसन सिताराम हिडामी (वय 42), व सकरू रामसाय गोटा (वय 35), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे तिघेही कुरखेडा तालुक्यातील लवारी येथील रहिवासी आहेत. या तिघांनाही न्यायालयाने 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

By

Published : Jun 25, 2019, 8:00 PM IST

Updated : Jun 25, 2019, 8:53 PM IST

नक्षल्यांनी केलेल्या स्फोटात शहीद झालेले जवान. (संग्रहीत)

गडचिरोली - कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा येथे 1 मे रोजी नक्षल्यांनी भुसुरूंग स्फोट घडवून आणला होता. या स्फोटात 15 जवान व एका खासगी वाहन चालक वीरमरण आले होते. यानंतर घटनेची मास्टरमाईंड नर्मदाक्का व तिचा पती किरण याला 11 जूनला गडचिरोली पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडून घटनेचा तपास सुरू असताना स्फोटाच्या कटात सहभागी असलेल्या आणखी तिघांना रविवारी अटक करण्यात आली. यामुळे या घटनेतील आरोपींची संख्या आता सातवर पोहोचली आहे.

नक्षल्यांनी केलेल्या स्फोटात शहीद झालेले जवान. (संग्रहीत)

सोमनाथ दलसाय मडावी (वय 38), किसन सिताराम हिडामी (वय 42), व सकरू रामसाय गोटा (वय 35), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे तिघेही कुरखेडा तालुक्यातील लवारी येथील रहिवासी आहेत. या तिघांनाही न्यायालयाने 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 11 जूनला नक्षल्यांच्या उप्पगुंटी निर्मलाकुमारी उर्फ नर्मदाक्का (58) आणि तिचा पती राणी सत्यनारायणा उर्फ किरण उर्फ किरणदादा (70) याला सिरोंचा येथून अटक केली होती. यातील नर्मदाक्का ही दंडकारण्य स्पेशल झोन समितीची सदस्य तसेच वेस्टर्न सबझोनल प्रमुख आहे. या दोघांना 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

या कोठडी दरम्यान स्फोटाची चौकशी करण्यात आली. यावेळी इतर नक्षल्यांच्या सहभागाबाबत विचारपूस करताना दिलीप हिडामी आणि परसराम तुलावी यांची नावे समोर आली. या माहितीच्या व अन्य तांत्रिक पुराव्याच्या आधारे दोघांनाही कुरखेडा पोलिसांनी अटक केली. त्या दोघांनाही 12 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. त्यांची चौकशी सुरू असताना 19 जून रोजी गडचिरोली पोलीस दलातील तपास पथकांनी तेलंगणा राज्यामधील टाकलेल्या धाडीतून लॅपटॉप, मोबाईल, पेनड्राईव्ह व इतर संशयित साहित्य जप्त केले. तर आणखी 3 आरोपींची नावे समोर आल्याने रविवारी सोमनाथ दलसाय मडावी, किसन सिताराम हिडामी, सकरू रामसाय गोटा या तिघांना अटक केली आहे.

आज सोमवारी अटक आरोपींना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी गडचिरोलीच्या न्यायालयात हजर केले आले. त्यावेळी न्यायालयाने तिन्ही आरोपींना 12 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे भुसुरुंग स्फोट प्रकरणात आतापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Last Updated : Jun 25, 2019, 8:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details