गडचिरोली - शेतात लावण्यात आलेल्या विजेच्या कुंपणाचा शॉक लागून दोन आदिवासी नागरिकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज समोर आली. रंगपंचमीच्या दिवशी सकाळी मुलचेरा तालुक्यात विवेकानंदपूरमध्ये हा प्रकार घडला. रमेश लक्ष्मण आत्राम (रा. मुलचेरा, वय ३० वर्ष) आणि दौलत बच्चा मडावी (रा. मुलचेरा, वय ४३वर्ष) असे मृतांची नावे आहेत.
कुंपणाला लावलेल्या विद्युत तारेच्या स्पर्शाने दोघांचा मृत्यू - electric shock
रमेश लक्ष्मण आत्राम रा. मुलचेरा (वय ३० वर्ष) आणि दौलत बच्चा मडावी रा. मुलचेरा (वय ४३वर्ष) असे मृतांची नावे आहेत.
मुलचेरा तालुक्यातील नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय लगत असलेल्या विवेकानंदपूर हद्दीतील आणि गट्टा मार्गावर मका शेती आहे. पिकाच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी शेतात विजेचा प्रवाह सोडला होता. या तारांना स्पर्श झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गावात पसरताच एकच खळबळ उडाली होती.
घटनेची माहिती मुलचेरा पोलिसांना देण्यात आली आहे. मुलचेराचे साहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद पाठक यांनी घटनास्थळाला भेट देऊन चौकशी सुरू केली. मात्र, ह्या दोन व्यक्ती कोणत्या कामासाठी शेत शिवारात गेले, याबाबत माहिती मिळाली नाही. मात्र, मका शेती शिवारात चारही बाजूने विजेचा प्रवाह सोडण्यात आल्याने त्यांचा मृत्यू झाला हे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मक्याची शेती कोणाची आहे, याबाबत अद्यापही माहिती मिळाली नसून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.