गडचिरोली- अहेरी तालुक्यातील बोगटागुडमवरुन आलापल्ली येथे जाणाऱ्या खासगी प्रवासी वाहनाचा अपघात झाला आहे. या वाहनात आश्रम शाळचे काही विद्यार्थी प्रवास करत होते. अपघातात ११ विद्यार्थी आणि इतर प्रवासी जखमी झाले आहेत.
गडचिरोलीत खासगी प्रवासी वाहन उलटले; आश्रम शाळेचे ११ विद्यार्थी जखमी - विद्यार्थी
जिमलगट्टपासून ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या उमानूर-येर्रागडाजवळ ट्रकला ओव्हरटेक करताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याच्या कडेला उलटले.
शाळा सुरू झाल्याने अहेरी तालुक्यातील एडीयाळ येथील आश्रम शाळेचे विद्यार्थी गडचिरोलीजवळ असलेल्या आश्रम शाळेत महिंद्रा मॅक्स या खासगी वाहनाने जात होते. दरम्यान, जिमलगट्टपासून ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या उमानूर-येर्रागडाजवळ ट्रकला ओव्हरटेक करताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. या अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला. ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास उमानुर-येर्रागड्डाजवळ घडली.
खासगी वाहनांमध्ये १५ ते १८ प्रवासी होते. जखमी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी २ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. जखमी प्रवाशांना अहेरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमी विद्यार्थी आणि प्रवाशांची नावे अद्याप कळू शकलेली नाहीत.