गडचिरोली - शेतकरी, शेतमजूर व महिलांना न्याय देण्यासाठी राहुल गांधींना पंतप्रधान करायचे आहे. त्यासाठी गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी यांना प्रचंड बहुमताने निवडून द्याव, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमीटीचे महासचिव खासदार राजीव सातव यांनी शनिवारी कुरखेडा येथे केले.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी-पिरिपा-शेकाप आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी यांच्या प्रचारार्थ स्थानिक जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणावर आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते. खासदार सातव म्हणाले, छत्तीसगड, मध्यप्रदेश व राजस्थानमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने तेथील जनतेला शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर काँग्रेसला विजय मिळताच अवघ्या २ दिवसांत कर्ज माफ करून शेतकऱ्यांना न्याय दिला. त्याचप्रमाणे या लोकसभा निवडणुकीत समाजातील प्रत्येक गोरगरीब कुटुंबाला वर्षाला ७२ हजार रुपये, कुटुंबातील महिला सदस्यांच्या बँक खात्यात दरमहा ६ हजार रूपये देण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच राज्याच्या विधिमंडळ काँग्रेसचे उपगट नेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात विदर्भाचा विकास करण्याचे आश्वासन देत लवकरच विजय वडेट्टीवारांना राहुल गांधींकडून मोठी जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे सांगितले.