गडचिरोली- जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातल्या लेंदारी पुलावर काल झालेल्या भुसुरुंग स्फोटात वीरमरण आलेल्या जवानांना गडचिरोली जिल्हा पोलीस मुख्यालय मैदानावर अंतिम सलामी देण्यात आली. आज दुपारी मुख्यालय मैदानावर या गंभीर सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री अंबरीश आत्राम यांची उपस्थिती होती.
शोकाकुल वातावरणात गडचिरोली हल्ल्यातील जवानांना अखेरचा निरोप
जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातल्या लेंदारी पुलावर काल झालेल्या भुसुरुंग स्फोटात वीरमरण आलेल्या जवानांना गडचिरोली जिल्हा पोलीस मुख्यालय मैदानावर अंतिम सलामी देण्यात आली.
जवानांना सलामी देण्यासाठी मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने आदरांजलीस्थळी पोहोचले. यावेळी पोलीस दलाच्या बँड पथकाने अंतिम धून सादर केली. १५ जवानांच्या पार्थिवावर मान्यवरानी पुष्पचक्र अर्पण करत आदरांजली अर्पण केली. तर बंदुकीच्या फैरी झाडून दलाने आपल्या वीर सहकाऱ्यांना नमन केले. यानंतर मौन पाळून उपस्थितांनी आपल्या संवेदना प्रकट केल्या.
मुख्यमंत्र्यांनी वीरमरण आलेल्या जवानांच्या परिवारातील सदस्यांशी यावेळी संवाद साधला. त्यांनी हा भ्याड हल्ला आहे. याचा जोरदार प्रतिकार करू, अशी भावना व्यक्त केली. यावेळी दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलीस महासंचालक स्वतः या घटनेची चौकशी करत असून चुका दुरुस्त करत नक्षलवाद निखंदून काढू, असा विश्वास व्यक्त केला.