महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडचिरोलीतील अनेक मार्ग बंद; जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पूरस्थिती कायम

तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पूरस्थिती कायम आहे. लहान नद्यांसह वैनगंगा नदीलाही पूर आल्याने आज सकाळच्या सुमारास आष्टी-चंद्रपूर हा राष्ट्रीय महामार्ग बंद पडला आहे.

पूरस्थिती पाहताना नागरिक

By

Published : Sep 5, 2019, 11:52 AM IST

गडचिरोली- तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पूरस्थिती कायम आहे. लहान नद्यांसह वैनगंगा नदीलाही पूर आल्याने आज सकाळच्या सुमारास आष्टी-चंद्रपूर हा राष्ट्रीय महामार्ग बंद पडला आहे. त्यामुळे दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील पाच तालुक्यांचा संपर्क तुटला आहे. तर भामरागड येथील पर्लकोटा नदीचे पाणी गावात शिरल्याने येथील अनेकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

गडचिरोलीतील पूरपरिस्थिती

३१ ऑगस्टपासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. काल सायंकाळपासून पावसाने थोडी उसंत घेतली आहे. मात्र, अद्याप पाणी ओसरला नसल्याने दुसऱ्या दिवशीही पूरस्थिती कायम आहे. गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने वैनगंगा नदीलाही पूर आला आहे. आष्टी जवळच्या मोठ्या पुलावर पाणी आल्याने आज सकाळी आष्टी-चंद्रपूर हा राष्ट्रीय महामार्ग बंद पडला. तर काल बुधवारी गडचिरोली-चामोर्शी, आष्टी-मुलचेरा, अल्लापल्ली-भामरागड, तळोधी-भाडभीडी, मौशीखांब-वडदा, मुलचेरा-सोमनपल्ली हे मार्ग आजही बंद आहेत.

दिना, किस्तापूर, गडअहेरी या नाल्यांना पूर आला असून पर्लकोठा नदीचे पाणी भामरागड गावात शिरले आहे. त्यामुळे भामरागडवासियांवर पाचव्यांदा पूरस्थितीचा सामना करण्याची वेळ आली आहे. सती, खोब्रागडी, गाढवी, कठाणी, गोदावरी, प्राणहिता या नद्यांही धोक्याच्या पातळीवर आहेत. प्रशासनाकडून पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू असून सॅटेलाइटच्या मदतीने परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. पावसामुळे भामरागड तालुक्यातील भ्रमणध्वनी सेवा ठप्प पडली असून वीज सेवाही प्रभावी झाली आहे. एकूणच पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details