गडचिरोली - राम जन्मभूमी अयोध्या येथील वादग्रस्त जमीन प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी गडचिरोली शहर पोलिसांनी सकाळी 9 वाजता शहरातून रोड मार्च काढून नागरिकांमध्ये जनजागृती केली. निकाल काहीही लागो, नागरिकांनी निकालाचा सन्मान करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांचे 'रोड मार्च'
राम जन्मभूमी अयोध्या येथील वादग्रस्त जमीन प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. या पाश्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी गडचिरोली शहरात पोलिसांनी सकाळी ९ वाजता शहरातून रोड मार्च काढून जनजागृती करण्यात आली.
गडचिरोली पोलीस ठाण्यातून पोलीस निरीक्षक प्रदीप चौगाणकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेला रोड मार्च शहरातील मुख्य मार्गाने फिरून पोलीस ठाण्यात समारोप करण्यात आला. यावेळी सि-60 कमांडो, पोलिस जवान, गृहरक्षक दल यांचा रोड मार्चमध्ये सहभाग होता. साडेदहा वाजता निकाल येणार असल्याने शहरातील मुख्य मार्ग तसेच काही ठराविक चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच समाज पुढार्यांच्या बैठका घेऊन पोलिसांनी संबोधित केले आहे. एकूणच निकाल काहीही लागला तरी नागरिकांनी निकालाचा सन्मान करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.