महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'या' जिल्ह्यातील दुकाने सायंकाळी 5 वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी

उद्यापासून गडचिरोली जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सशर्त सुरु राहणार आहेत, असे आदेश जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी दिले आहेत.

बाजार पेठ
बाजार पेठ

By

Published : May 8, 2020, 8:33 PM IST

गडचिरोली -कोरोना संसर्गच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी शुक्रवारी आदेश जारी करुन ग्रीन झोन गडचिरोली जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजतापर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. हा आदेश शनिवारपासून (दि. 9 मे) लागू होईल. या शिवाय केस कर्तनालयेही सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. केस कर्तनालयात एका वेळी एकाच ग्राहकास प्रवेश देऊन केस कापावे, दुकानदार व कारागीराने स्वत: च्या चेहऱ्यावर मास्क बांधावा, वारंवार एकच कापड वापरला जाणार नाही याची दक्षता दुकानदाराने घ्यावी, असे आदेशात नमूद आहे.

शासकीय कार्यालयांच्या प्रमुखांनी आपापल्या अखत्यारितील कार्यालयांमध्ये शंभर टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य करावी, असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. सर्व रुग्णालये, पॅथालॉजी केंद्रे, सोनोग्राफी केंद्रे, औषध विक्रेते यांना वेळेचे बंधन राहणार नाही. रिक्षा व सायकल रिक्षामध्ये एक चालक व दोन प्रवासी घेऊन वाहतूक सेवा सुरु करता येईल. हे सर्व करताना सामाजिक अंतर ठेवून शासनाचे नियम पाळावेच लागतील, तसेच सर्व व्यक्तींच्या आंतरजिल्हा हालचाली विनापरवाना बंदच राहतील. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या पूर्वपरवानगीने प्रशासकीय कारणास्तव वाहतूक करता येईल आणि जिल्ह्यांतर्गत प्रवासाला कोणत्याही पासची गरज नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

सर्व शैक्षणिक व प्रशिक्षण देणाऱ्या संस्था, कँटीन, मॉल्स, खरेदी संकुले, व्यायामशाळा, क्रीडा संकुले, जलतरण तलाव, लॉज, मनोरंजन पार्क, प्रेक्षागृहे, बार, सभागृहे बंदच राहतील. सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, पान टपऱ्या, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारी दुकाने बंद राहतील. पेट्रोल, डिझेलच्या विक्री किंवा खरेदीस तहसीलदाराकडून परवाना घेण्याची आवश्यकता असणार नाही. विवाह कार्यक्रमास जास्तीत जास्त ५० लोकांच्या जमावास व अंत्यसंस्कारास २० लोकांना परवानगी असेल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा -शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन सापडली सांडपाण्याच्या डबक्यात; महामार्ग कंत्राटदाराचा प्रताप

ABOUT THE AUTHOR

...view details