गडचिरोली- पत्नीसह शेतशिवारात मोहफुले वेचण्यास गेलेल्या व्यक्तीची नक्षलवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी सात वाजता कोरची तालुक्यातील कोटगुल पोलीस मदत केंद्रांतर्गत कोहका-मोकासा गावाजवळ घडली. जिवता गणपत रामटेके (वय ४५ रा.कोटगुल) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी ही हत्या केली आहे.
पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयातून नक्षलवाद्यांकडून एकाची गोळ्या घालून हत्या - गडचिरोली बातमी
शेतशिवारात मोहफुले वेचण्यास गेलेल्या व्यक्तीची नक्षलवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन केलेली ही दुसरी हत्या आहे. यामुळे कोरची तालुक्यात दहशत निर्माण झाली आहे.
हेही वाचा-बारामतीत आणखी दोन रुग्ण कोरोनाबाधित; कुटुंबातील व्यक्तींना लागण
कोटगुल येथील जिवता रामटेके हा पत्नी नीलमसह बुधवारी पहाटे कोहका-मोकासा येथील शेतशिवारात मोहफुले वेचण्यासाठी गेला होता. तेथे एक नक्षल महिला मोहफुले वेचत होती. तिने जिवता रामटेची पत्नी नीलम हिला तिच्या पतीचे नाव विचारले. त्यानंतर काही क्षणातच दोन नक्षलवादी तेथे आले. त्यांनी नीलमला पकडून ठेवले आणि दुसऱ्या नक्षल्यांनी जिवताला दोनशे मीटर अंतरावर नेऊन गोळ्या घालून त्याची हत्या केली. मात्र, आपला पती जिवंत असल्याचे लक्षात येताच नीलमने कोटगुल हे गाव गाठून तेथील रुग्णवाहिका घटनास्थळी नेली. जिवताला कोटगुल प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. परंतु, तेथे उपचार न झाल्याने त्यास कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, वाटेतच जिवता रामटेके याने प्राण सोडला.
जिवता रामटेके यास एक मुलगा व दोन मुली असून, येत्या २६ एप्रिलला मनिषा नामक मुलीचे लग्न नियोजित होते. यामुळे रामटेके कुटुंबावर आघात झाला आहे. घटनेचा तपास कोरची पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली कोटगुल पोलीस मदत केंद्राचे अधिकारी राऊत करीत आहेत. चालू आठवड्यात नक्षलवाद्यांनी पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन केलेली ही दुसरी हत्या आहे. यामुळे कोरची तालुक्यात दहशत निर्माण झाली आहे.