गडचिरोली - पारंपरिक व्यवसायावर अवलंबून न राहता उपलब्ध असलेल्या साधनसामुग्रीचा वापर करणे. त्यामधून ग्रामीण भागातील कुटुंबात समृद्धी आणण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन चळवळीची उभारणी करण्यात आली आहे. या चळवळीने गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याच्या मालदुगी येथील महिला बचत गटांच्या कुटुंबातील आर्थिक चित्रच बदलून टाकले आहे. मध संकलनाच्या त्यांच्या उपक्रमाने अनेकांच्या कुटुंबात गोडवा आणला आहे.
'गाव करी ते राव ना करी'; गडचिरोलीतील नक्षलग्रस्त गावात मधाने महिलांच्या कुटुंबात आणला गोडवा गडचिरोली म्हणजे नक्षल चळवळ, मागास, उद्योगांची वानवा, महाराष्ट्रातील मागासलेपणाचे वास्तव समजले जाते. मात्र, ग्रामीण भागातील रहिवाशांची जंगलावरची अवलंबिता कमी करून रोजगाराची नवी संधी निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची उभारणी करण्यात आली आहे. या माध्यमातून विविध दुर्गम भागांमध्ये सामाजिक उत्थानाचे काम केले जात आहे. जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातल्या मालदुगी गावात याच अभियानाच्या माध्यमातून समृद्धीची पावले उमटू लागली आहेत. या भागात शेती व्यवसायावर गावातील अर्थकारण अवलंबून आहे. मात्र, लहरी निसर्ग आणि मजुरांची समस्या यामुळे हा व्यवसाय डबघाईस येत होता.
कुरखेडा भागात मुख्यमंत्री सामाजिक ग्रामपरिवर्तक म्हणून काम करणाऱ्या श्याम वावरे यांना ढासळत चाललेली शेती व्यवस्था आणि विस्कटत चाललेली कुटुंबे यावरचा उपाय गावातच गवसला. गावातील महिला जंगलातून संकलीत केलेले मध गावातच येणाऱ्या व्यापाऱ्यांना विकत होत्या. मात्र, त्यातून फार उत्पन्न मिळत नव्हते. गावातील महिलांना उत्तम अर्थसहाय्य आणि या मधाचे ब्रँडिंग करण्यासाठी प्रक्रिया केंद्र आणि प्रशिक्षण देण्याची तयारी अभियानाच्या अधिकाऱ्यांनी दर्शवली. गावात एक मोठा बदल घडून आणत गावातील महिलांनी संकलित केलेले मध आता 'इकोवन' या नावाने त्याची ब्रँडिंग करून विक्री केला जात आहे. यामुळे या बचत गटाच्या महिलांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. या महिला बचत गटात १२ सदस्यांचा समावेश आहे. उन्हाळ्यात या महिला जंगलात जाऊन मध संकलन करतात. तसेच उर्वरित काळात हे मध बाटलीबंद करून विकले जाते.
'गाव करी ते राव ना करी' अशी एक म्हण आहे. गावाने मनात आणल्यास आपल्या आजूबाजूच्या साधन संपत्तीचा वापर करून नेमके परिवर्तन घडवून आणता येते, हे मालदूगीच्या प्रयत्नाने अधोरेखित केले आहे. मात्र, यामध्ये पतपुरवठा आणि प्रशिक्षणाचा नियोजनपूर्वक वापर करत संधीचे नफ्यात रूपांतर करणाऱ्या सामाजिक परिवर्तन चळवळीचा मोलाचा वाटा आहे. या गावात केवळ महिलांचाच विकास झाला असे नाही, तर गावातील प्रत्येक घटक विकसीत व्हावा, यासाठी ग्राम पंचायत आणि ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अग्रेसर आहे.
शाळेतील बोलक्या भिंती, वृक्षारोपण, सिंचनासाठी तलाव, स्वच्छ पाणी, वनहक्क, समृद्ध वाचनालय या गावाला आणखी समृद्ध करीत आहे. शासकीय योजनांची निष्ठेने आणि प्रामाणिकपणे अंमलबजावणी केली तर काय चमत्कार होऊ शकतो? हे मालदुगी या गावाने दाखवून दिले आहे. ग्रामपंचायत ही केवळ नावापुरती असते हा समजही खुद्द लोकांनीच दूर केला. आज ग्रामसभेत पुरुषांपेक्षा महिलांची उपस्थिती अधिक असते आणि प्रत्येक समस्या आणि विकासाचे नियोजन करतात.