गडचिरोली - आज नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या जिल्हाबंदच्या पार्श्वभूमीवर एटापल्ली-आलापल्ली मार्गावर झाडे तोडून नक्षलवाद्यांनी रस्ता बंद केला आहे. तर वनविभागाच्या लाकूड डेपोलाही आग लावल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नक्षल बंदमुळे दुर्गम भागातील बसफेऱ्या व इतर वाहतूक ठप्प झाली आहे.
गडचिरोलीत नक्षलवाद्यांच जळीतकांड; वनविभागाच्या लाकडांची जाळपोळ - आलापल्ली
आज नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या जिल्हाबंदच्या पार्श्वभूमीवर एटापल्ली-आलापल्ली मार्गावर झाडे तोडून नक्षलवाद्यांनी रस्ता बंद केला आहे.
२७ एप्रिल रोजी भामरागड तालुक्यातील गुंडूरवाही परिसरात पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत भामरागड दलमची कमांडो रामको व सदस्य शिल्पा धुर्वा या दोघींना पोलिसांनी कंठस्नान घातले होते. मात्र, ही चकमक खोटी असल्याचा आरोप करीत त्या चकमकीचे खंडन करा, असे आवाहन करीत आज नक्षलवाद्यांनी जिल्हा बंदची हाक दिली. यासंदर्भात एटापल्ली तालुक्यातील गुरूपल्ली मार्गावर तसेच आलापल्ली-एट्टापली मार्गावर व भामरागड मार्गावर शुक्रवारी पत्रके आढळून आले होते.
आज बंदच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी एटापल्ली-आलापल्ली मार्गावर झाडे तोडून मार्ग बंद केला. तर, गुरूपल्लीजवळ असलेल्या वनविभागाच्या लाकूड डेपोलाही आग लावली. यात लाखो रुपयाचे लाकडेही जळून खाक झाले. नक्षल बंदमुळे दुर्गम भागातील बससेवेसह इतर वाहतूक पूर्णतः बंद आहे.